शहरातील अंमली पदार्थ विक्रीवर सायबर शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून नशा करण्यासाठी तब्बल 1700 बटन गोळ्या व 10 सिरप तसेच व धारदार चाकू जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली.
शहरातील अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतंत्र अंमली पदार्थ प्रतिबंध पथक स्थापन केले आहे. या पथकाने शहरातील वेगवेगळ्या भागातून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवली आहे. त्यातच आता या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांकडे सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने आपला मोर्चा वळविला आहे.
सुरतवरून नशा करण्यासाठी येणाऱ्या बटन गोळ्या व सिरप औषधी आरआर कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसमध्ये येत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी नगर नाका येथे आज मंगळवारी सकाळी सापळा रचून या ट्रॅव्हल्स बसची झडती घेतली असता निट्रेझेपामच्या सुमारे 1700 गोळ्या, 10 कोडीन सिरप आणि चाकू असा 15 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल अकबर सलीम शेख, (23, रा. बायजीपुरा), सलमान सऊद सय्यद (27, रा. रहिमनगर, अल्तमश कॉलनी) आणि माजिद युनूस बेग (24, रा. गल्ली क्र. 32, बायजीपुरा) यांच्याकडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मागदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, सागर पाटील, हवालदार विनोद परदेशी, सुधीर मोरे, रंजक सोनवणे, सतीश हंबर्डे, अंमलदार राजाराम वाघ, सुनील बेलकर, नितीन देशमुख, सोहेल पठाण, प्रमोद सुरसे आणि अन्न व औषधी विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकर यांनी केली.
आयुक्तालयात उलट-सुलट चर्चा
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्रीला आळा घालून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र अंमली पदार्थ प्रतिबंध पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने अंमली पदार्थ विक्री करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणले असताना सायबर शाखेने केलेल्या या कारवाईमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सायबर पोलिसांच्या या कारवाईमुळे पोलीस आयुक्तालयात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.