अमेरिकेत 47व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोघांनाही अध्यक्षीय निवडणुकीसाठी जनमत चाचणीमध्ये जवळपास समसमान विजयाची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
पहिली मतपत्रिका न्यू हॅम्पशायरमध्ये टाकण्यात आली. हॅरिस आणि ट्रम्प यांना डिक्सव्हिल नॉचच्या छोटय़ा न्यू हॅम्पशायर समुदायात प्रत्येकी तीन मते मिळाली. अमेरिकेत मतदान सुरू असताना दक्षिण हिंदुस्थानातील लोक हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांच्या विजयासाठी प्रार्थना करत असल्याचे चित्र दिसत होते. कमला हॅरिस यांच्या गावातील लोकांनीही प्रार्थना केली. दुसरीकडे ट्रम्प यांना पाठिंबा देणारे एलन मस्क यांनी ट्रम्प पराभूत झाले तर ही अमेरिकेची शेवटची निवडणूक असेल. देशातील लोकशाही संपुष्टात येऊन एकच डेमोक्रॅटिक पक्ष शिल्लक राहील असा इशारा दिला, तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज मतदानाचा दिवस असून लाखो अमेरिकी नागरिक घराबाहेर पडून मतदान करतील आणि जगाला दाखवतील की आपण कोण आहोत, कोणत्या मूल्यांसाठी उभे आहोत. तेव्हा सगळय़ांनी घराबाहेर पडून मतदान करा, असे आवाहन ओबामा यांनी एक्सद्वारे केले आहे.
ट्रम्प म्हणाले, लढा राक्षसी व्यवस्थेशी
ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी मिशिगनमधील शेवटच्या रॅलीला संबोधित केले. माझी स्पर्धा कमला हॅरिस यांच्याशी नाही तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या राक्षसी व्यवस्थेशी आहे, असे ट्रम्प म्हणाले.