महाराष्ट्रातील मिंधे–भाजपचं भ्रष्ट आणि महाराष्ट्रद्रोही सरकार तडीपार करण्यासाठी महाविकास आघाडीने एल्गार पुकारला असून उद्या वांद्रे–कुर्ला संकुलातील मैदानावर दणदणीत स्वाभिमान सभा होणार आहे. या सभेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या तोफा धडाडणार असून विराट जनसागराच्या साक्षीने महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’ जाहीर करणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून प्रचारासाठी मोजकेच दिवस उरले आहेत. त्यामुळे सोमवारी उमेदवारांच्या माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होताच आजपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात अंबामातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा केला. त्यानंतर राधानगरी मतदारसंघात आदमापूर येथे उद्धव ठाकरे यांची विराट सभा झाली. त्यानंतर सायंकाळी कोकणात रत्नागिरीमध्ये झंझावाती सभेने भगवे तुफान आले. उद्या दुपारी 3 वाजता भिवंडी ग्रामीण मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून त्यानंतर सायंकाळी बीकेसी मैदानात होणाऱ्या संयुक्त सभेला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.
महाराष्ट्राला रसातळाला नेणाऱ्या मिंधे-भाजप सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार या सभेत सर्वच नेते घेणार आहेत. याच सभेतून महाराष्ट्र जिंकण्याचा एल्गार पुकारला जाणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राहुल गांधी दीक्षाभूमीला करणार अभिवादन
राहुल गांधी उद्या मुंबईला येण्याआधी नागपुरात जाणार आहेत. सर्वप्रथम ते दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन करणार असून त्यानंतर सकाळी 11 वाजता सुरेश भट सभागृहात होणाऱ्या संविधान संमेलनाला संबोधित करणार आहेत. संविधान वाचवण्यासाठी सुरू असलेला लढा बुलंद करण्यासाठी हे संमेलन होत असून या संमेलनाला दोनशेहून अधिक संघटनांचा पाठिंबा आहे.
महाष्ट्राच्या विकासाची आणि प्रगतीची गॅरंटी या सभेतून महाविकास आघाडी देणार आहे. उपेक्षित, दलित, शोषित, पीडित, बहुजनांच्या उन्नतीचे वचनच या माध्यमातून दिले जाणार आहे. मिंधे-भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र 11 व्या नंबरवर घसरला असून महाराष्ट्राला पुन्हा नंबर वन बनवून गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार यावेळी केला जाणार आहे.
स्थळ – वांद्रे-कुर्ला संकुल मैदान
वेळ – सायंकाळी 6 वाजता