नेहमीच गरीब गरजू आणि भुकेल्यांना आपुलकीचे आणि प्रेमाचे दोन घास देणाऱया सौरभ मित्र मंडळाच्या ’अन्नमित्र’ सत्कार्याने टाटा रुग्णालय परिसरात 300 गरीब, गरजूंसह कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली.
सौरभ मित्र मंडळाच्या अन्नमित्र उपक्रमाच्या माध्यमातून गेली चार वर्षे केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या परिसरात गरीब, गरजू आणि भुकेल्यांना अन्नदान केले जात आहे. यंदा दिवाळीनिमित्त अन्नमित्रचे प्रमुख संजय सोमनाथ शेटये यांनी पुढाकार घेत 300 गरीबांची दिवाळी गोड करण्याचे कार्य केले. या सत्कार्यासाठी राजेश सोनावडेकर, भारतेंदु तिवारी, दिलीप कदम, संभाजी कदम, संदीप शुक्ला, सुलभा गोरिवले, अनन्या गुरव, नुरूर खानोलकर, सुजाता परब, दर्शना पाटील यासारख्या अनेक दात्यांनी सढळ हस्ते फराळाचे साहित्य देऊन सहकार्य केले. यावेळी माजी महापौर महादेव देवळे, रणजीपटू सिद्धेश लाड, मुंबई पोलीस दलातील अशोक शिरसाट, वसंत खामकर, अनिल बोंग उपस्थित होते. यावेळी किरण शेट्टी आणि सुनीता कोटियन यांनी 125 महिलांना साडय़ाही वितरित केल्या.
n नम्रता पाटोळे आणि शलाका पाटोळे यांच्या घरातील चिमुकल्या शैवी पाटोळे आणि श्रीशा पाटोळे यांनी आपल्या आई-बाबांकडून केले जाणारे सत्कार्य पाहून अन्नमित्रच्या फराळासाठी आपल्या पिगी बँकेत जमा झालेले सर्व खाऊचे पैसे दिले.