वार्तापत्र – नाशिक मध्य, पश्चिम, देवळालीत शिवसेनेची विजयाकडे वाटचाल

>>बाबासाहेब गायकवाड

नाशिकमधून महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘नाशिक मध्य’मधून माजी आमदार वसंत गीते, पश्चिममधून सुधाकर बडगुजर, देवळालीतून माजी आमदार योगेश घोलप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. गेल्या काही वर्षांत शहराची विकासात पिछेहाट झाली आहे. धगधगत्या मशालीच्या तेजाने विकासाची अन् विजयाची नवी पहाट उजाडण्याच्या खात्रीने जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.

शहराचा मध्यवर्ती आणि मुख्य बाजारपेठेचा भाग असलेला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ आहे.  या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला आघाडी मिळाली होती. माजी महापौर, माजी आमदार म्हणून वसंत गीते यांनी केलेले कार्य, सर्व समाजाशी असलेली त्यांची जवळीक आणि जिव्हाळय़ाचे संबंध यामुळे त्यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यक्तिगत भेटीगाठी, थेट संपर्क, कार्यकर्त्यांची फळी यामुळे त्यांनी मतदारसंघ प्रचाराने व्यापून टाकला आहे. गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचा विळखा हा या मतदारसंघाला शाप ठरत आहे. गीते यांच्या विजयातून हा शाप कायमचा नष्ट होईल, अशी जनतेची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. विजय निश्चित मानला जात आहे. भाजपकडून आमदार देवयानी फरांदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीतील वाद आणि भाजपातील अंतर्गत विरोधाने त्या पराभवाच्या छायेत आहेत.

बहुसंख्य कामगार वसाहत असलेल्या नाशिक पश्चिम अर्थात सिडको, सातपूर मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे उमेदवारी करीत आहेत. बहुसंख्य कामगार वर्ग येथे आहे. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड यासह जिह्यातील सर्वच भागातील नागरिक येथे मतदार आहेत. जळगाव, धुळे भागातील मूळ रहिवाशीही या भागात स्थायिक झालेले असून त्यांची संख्याही लक्षणीय आहे. कामगार, उद्योजक, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक असा हा संमिश्र मतदारसंघ आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. महापालिकेत येथून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक विजयी होतात. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी फळी, अचूक आणि सूक्ष्म नियोजन यामुळे सुधाकर बडगुजर यांचा सूत्रबद्ध प्रचार सुरू आहे. वैयक्तिक संपर्क, गाठीभेटी, चौकसभा, जॉगिंग ट्रकवर नागरिकांशी संवाद या सर्वच ठिकाणी त्यांना जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेतील नगरसेवक म्हणून विविध पदांवर केलेल्या कामांच्या अनुभवांवर त्यांनी प्रभागात सर्वांगीण विकास साधला आहे. मतदारसंघाचा विकास करणारा चेहरा म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहतात, मशालीशिवाय पर्याय नाही, असे सांगत नागरिक त्यांच्या विजयाची खात्री देत आहेत. अजित पवार गटातून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार अपूर्व हिरे हे प्रचारात सक्रीय झाले आहेत. महाविकास आघाडीतील मतविभागणी टाळण्यासाठी माकपाचे ज्येष्ठ नेते डॉ. डी.एल. कराड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. माकपाच्या एकगठ्ठा मतांचा लाभही शिवसेनेला होणार आहे. सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या भाजपाच्या सीमा हिरे यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. भाजपातील इच्छुकांनी त्यांना उघड विरोध केलेला असल्याने प्रचारात त्या पिछाडीवर आहेत. मनसेचे इंजिन घेऊन पळताना दिनकर पाटील यांची दमछाक झाली आहे.

देवळालीतील जनतेचे शिवसेनेशी अतूट नाते आहे. माजी मंत्री बबन घोलप यांना येथील जनतेने तब्बल पाच वेळा संधी दिली होती. आता उमेदवार असलेले योगेश घोलप यांना यापूर्वी एकदा संधी मिळालेली आहे. यावेळीही त्यांना पुन्हा संधी मिळेल, असे चित्र आहे. योगेश घोलप यांची अजातशत्रू अशी ओळख आहे. त्यांचा प्रचार वेगात सुरू आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे. धगधगत्या मशालीच्या तेजातून विकासाची नवी पहाट पुन्हा उजाडेल, अशी अपेक्षा घराघरातून व्यक्त होत आहे. अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांच्याकडे मतदारांनी सुरुवातीपासूनच पाठ फिरवली आहे. शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांना पदाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्या एकाकी पडल्या आहेत.