महाविकास आघाडीला समाजातील सर्वच घटकांचा विधानसभा निवडणुकीत जोरदार पाठिंबा मिळत आहे. आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात गुंतले असून राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांना जनतेचे समर्थन मिळत आहे. समाज विकास क्रांती पार्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळेल आणि महायुती आपल्या कारभारामुळे सत्तेतून बाहेर पडेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास आघाडी निवडणुकीत जे मुद्दे घेऊन लढत आहे आणि महाराष्ट्राचे हित लक्षात घेता सत्ताधारी महायुतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी समाज विकास क्रांती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंह यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि तत्व तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शिवसेनेला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान
फोडा आणि राज्य करा ही भाजपची निती आहे. त्यामुळे देशाच्या विघटन करणाऱ्या शक्तींना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत आपली पार्टी पाठिंबा देत आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समाज विकास क्रांती पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आल्याचे अशोक सिंह यांनी सांगितले.