मुंबईतील क्रीडा क्षेत्राला उभारी देण्यासाठी, पायाभूत क्रीडा सुविधा सुधारण्याचे आणि मुंबई शहरातील क्रीडा प्रकार जिवंत ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबई स्पोर्ट्सने आपल्या वार्षिक क्रीडा पुरस्कारांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई स्पोर्ट्सच्या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 9 नोव्हेंबर आहे.
मुंबई स्पोर्ट्सच्या वतीने 2023-24 सालासाठी ‘स्पोर्ट्सपर्सन्स ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून एम. सोमैया यांच्या अध्यक्षतेखाली जया शेट्टी, प्रदीप गंधे, उदय देशपांडे, दत्तू फडतरे, संजय घारपुरे, संदीप कदम यांची समिती पुरस्कार्थ्यांची निवड करतील. येत्या 28 नोव्हेंबरला कुर्ल्यातील बंट्स संघ येथे हा पुरस्कार सोहळा पार पडेल.
या पुरस्कारासाठी मुंबईतील स्थायी रहिवासी असलेला खेळाडू जो राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त खेळामध्ये प्रावीण्य मिळवले आहे असा कोणताही खेळाडू अर्ज करू शकतो. त्यासाठी क्रीडापटू स्वतः अथवा संघटना क्रीडापटूंचा अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी 98210 96400 या क्रमांकावर क्षितिज वेदक यांच्याशी संपर्क साधता येईल. गेल्या वर्षी प्रथमच देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळय़ात ‘स्पोर्ट्स पर्सन्स ऑफ द इयर’ पुरस्कार दिया चितळे (टेबल टेनिस), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) यांचा गौरव करण्यात आला होता तर अपेक्षा फर्नांडिस (स्विमिंग), निशिका काळे (रिदमिक जिम्नॅस्टिक), इशप्रीत सिंग चड्डा (स्नूकर) व निखिल दुबे (बॉक्सिंग) या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला होता.