कलिना मतदारसंघात प्रचाराला दणदणीत सुरुवात; संजय पोतनीस यांची पावलोपावली ओवाळणी, पुष्पवृष्टीने स्वागत

कलिना विधानसभेत पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणणार, महाविकास आघाडी सरकारच पुन्हा सत्तेवर आणणार असा निर्धार आज कलिन्यातील कानाकोपऱ्यात दिसून आला. मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पोतनीस यांच्या प्रचाराला आजपासून दणदणीत सुरुवात झाली. नाक्यानाक्यांवर, चौकांमध्ये  पावलोपावली ओवाळणी आणि पुष्पवृष्टीने संजय पोतनीस यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रचारात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यादेखील मोठय़ा संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांसह सहभागी झाल्या होत्या. प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांसह हजारो शिवसैनिकांचा उत्साह दिसून आला.

मतदारसंघात जवळपास 100 ठिकाणी संजय पोतनीस यांचे हारतुऱ्यांसह स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गल्लोगल्ली ओवाळणी, रस्तोरस्ती पुष्पवृष्टी करण्यात आली. शाखा क्रमांक 88 शिवाजीनगर येथून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. शाखा क्रमांक 89 आणि 91 पर्यंत दणदणीत प्रचार रॅली काढण्यात आली. मिंधे सरकारला सत्तेवरून खाली खेचून महाविकास आघाडीचे सरकार आणायचेय. कलिन्यात पुन्हा आपलाच उमेदवार निवडून आणायचाय. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है… आवाज कुणाचा… शिवसेनेचा… उमेदवार कुणाचा… महाविकास आघाडीचाच… अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी विभागप्रमुख महेश पेडणेकर, विधानसभाप्रमुख शोभन तेंडुलकर, उपविभागप्रमुख बळीराम घाग, महिला विधानसभा संघटक हर्षदा परब यांच्यासह शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख तसेच विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

z संजय पोतनीस यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसतर्फे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. आज त्या स्वतः प्रचारात सहभागी झाल्या. महाविकास आघाडीचाच उमेदवार कलिनातून निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील मोठा आहे.