पर्थवर खेळणार नसशील तर कर्णधारपदालाही अर्थ नाही; सुनील गावसकरांनी रोहित शर्माला झापले

न्यूझीलंडविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे हिंदुस्थानने आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पूर्ण ताकदीने उतरायला हवे. मात्र पर्थविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे खेळत नाहीय. पर्थ कसोटीला हलक्यात घेणाऱया कर्णधार रोहित शर्माच्या वृत्तीबाबत माजी महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी त्याला चांगलेच झापले आहे. जर रोहित पर्थवर खेळणार नसेल तर त्याने उर्वरित मालिकेतही हिंदुस्थानचे नेतृत्व करू नये, असा थेट सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयात हिंदुस्थानच्या कर्णधाराने पहिला सामना खेळणं अत्यंत महत्त्वाचं असते, ही जाणीवही गावसकरांनी करून दिली आहे. त्यामुळे गावसकरांचा सल्ला रोहित किती मनावर घेतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होत आहे. मायदेशामध्ये न्यूझीलंड विरुद्ध 3-0 ने पराभव पत्करावा लागल्यानंतर अवघ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयावर लागले आहे, मात्र रोहित पर्थवर खेळला जाणारा पहिला कसोटी सामना खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. रोहित वैयक्तिक कारणामुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जातेय. त्याच्याऐवजी जसप्रीत बुमरा संघाचे हंगामी कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे. याबाबत सुनील गावस्कर एका क्रीडा वाहिनावर स्पष्टपणे म्हणाले, ‘कर्णधाराला पहिला सामना खेळणं महत्त्वाचं असतं. जर तो जखमी असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण पहिल्याच सामन्यात कर्णधाराची अनुपस्थिती असेल तर उपकर्णधारावर दबाव वाढतो. त्यानंतर कर्णधारपदाची पुन्हा जबाबदारी स्वीकारणं कठीण होऊन बसतं. मला पण माहिती नाही, पण जे काही कळतं ते वाचून कळतं. रोहित पहिल्या आणि कदाचित दुसऱया सामन्यातही खेळणार नाही. जर असं असेल तर निवड समितीने याबाबत आताच स्पष्ट काय ते बोललं पाहिजे. अजित आगरकरने सांगितलं पाहिजे की, जर तुला आराम करायचा असेल तर आराम कर. मग तुझे कोणतेही वैयक्तिक कारण असू दे. जर रोहित पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तीन कसोटी सामने खेळणार नसेल तर त्याने दौऱयावर एक खेळाडू म्हणून जावे. तुला जेव्हा खेळायचे असेल तेव्हा जा. कर्णधाराची एक जबाबदारी आहे,’ असेही ते पुढे म्हणाले.