वरळीत मिंधे उमेदवार मिलिंद देवरांकडून मतदारांना पैसे वाटप, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

वरळी विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी त्यांच्या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला 500 रुपये वाटले असा आरोप करत शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरून आयोगाने याप्रकरणी चौकशी करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

शिवसेना नेते-खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल केली. देवरा यांनी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 500 रुपये दिल्याची माहिती सहभागी लोकांनी प्रसारमाध्यमांच्या पॅमेऱ्यांसमोर दिली होती. ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. ते फुटेजही आयोगाला देण्यात आले. हा आचारसंहितेचा भंग असून त्याची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने या तक्रारीमध्ये केली आहे. तसेच तो संपूर्ण खर्च देवरा यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

शिवसेनेच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित व्हिडीओची 24 तासांच्या आत पडताळणी करून कार्यवाही अहवाल सादर करावा, असे आदेश आयोगाने अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.