वादग्रस्त पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून तात्काळ हटवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर पोलीस महासंचालकाचा अतिरिक्त कार्यभार सध्यातरी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. पण या पदावर कुणाची नियुक्ती होणार हे अजून कळालेले नाही. या पदासाठी विवेक फणसाळकर यांच्यासोबत आणखी तीन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.
रश्मी शुक्ला यांच्या नंतर पोलीस महासंचालकपदासाठी तीन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. राज्य सरकारने या पदासाठी तीन नावांची शिफारस केली आहे. त्यात रितेश कुमार, संजय वर्मा आणि विवेक फणसाळकर यांच्या नावाचा समावेश आहे. शुक्ला यांची उचलबांगडी झाल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. जून 2024 मध्ये शुक्ला या निवृत्त होणार होत्या राज्य सरकारने त्यांना जानेवारीमध्ये त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आला होता.
या पदासाठी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची निवड होणार होती. 26/11 च्या हल्ल्यात दाते यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. दाते हे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेची धुरा सांभाळत आहेत. दाते यांच्यानंतर फणसाळकर हे वरिष्ठ अधिकारी आहेत. दाते 31 मार्चपासून राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुखपद सांभाळत आहेत आणि डिसेंबर 2026 ला त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. पण राज्य सरकारने दाते यांना नियुक्त करायचे ठरवले तर केंद्र सरकार त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही.
निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील नवीन राज्य सरकार रश्मी शुक्ला यांच्यावर निर्णय घेऊ शकतात. राज्याचे महासंचालक कोण होणार? याचा निर्णय निवडणूक आयोगाने पुढच्या सरकारवर सोपवला आहे. पोलीस महासंचालकाची जबाबादारी रश्मी शुक्ला यांच्यावर टाकायची की नवीन अधिकारी नियुक्त करायचे? हे आगामी सरकार ठरवेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.