फडणवीस यांच्या आदेशाला मावळ भाजपची केराची टोपली; ‘मावळ पॅटर्न’ राबविण्यावर पदाधिकारी ठाम

मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांचे काम करण्याचा भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ भाजपला दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत ‘मावळ पॅटर्न’ राबविण्याचा ठाम निश्चय पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे अजित पवार गट प्रचंड संतप्त झाला असून, याचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. मावळची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली. पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. भेगडे यांना मावळ भाजपसह अन्य पक्षांनी जाहीर पाठिंबा देत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आणला. दुसरीकडे मावळातील भाजपच्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचे राजीनामे देत बापू भेगडे यांचा प्रचारही सुरू केला आहे.

मावळमध्ये शेळके यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने दबावतंत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी चिंचवडमधून अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शेळके यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकारी सक्रिय होण्याचे आणि जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण माघार घेतल्याचे काटे यांनी जाहीर केले. मात्र, त्यानंतरही भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे बापू भेगडे यांचा प्रचार करण्यावर ठाम आहेत.

याबाबत माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, मावळची लढाई ही प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आम्ही भेगडे यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम आहोत.