आमच्या पक्षाची भूमिका ‘बटेंगे तो कटेंगे’ची नाही! – पंकजा मुंडे

‘बटेंगे तो कटेंगे’ हा मुद्दा काय आहे? कोणी असे मेसेज समाजमाध्यमांवर टाकत आहे. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कोणीही जातीधर्माचे राजकारण करू नये. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी देत किमान निवडणुकीपुरता का होईना भाजपने ‘कट्टर हिंदुत्ववादी’ मुद्द्याला बाजूला सारल्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यात भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार, जाती धर्मात तेढ वाढवणार असे फेक नरेटिव्ह वापरले होते. महाराष्ट्रात त्याचा आम्हाला नक्कीच फटका बसला. परंतु, आता जनतेला वस्तुस्थिती लक्षात आल्याने विरोधकांचे फेक नरेटिव्ह आता चालणार नाही.

‘बटेंगे तो कटेंगे’ हे काय आहे? काहीजण समाजमाध्यमांवर असे मेसेज टाकतात, ही आमच्या अथवा आमच्या मित्रपक्षांची भूमिका नाही. आमच्यासाठी सर्व नागरिक समान आहेत. समाजात दुही पसरविण्याची आमची भूमिका नाही, असे स्पष्ट करत त्यांनी ‘कट्टर हिंदुत्ववादी’ कार्यकर्त्यांना एकप्रकारे संदेश दिला.