काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर व त्यांच्या पत्नी संगीता अशोक निलंगेकर यांनी केलेली बंडखोरी व निलंगा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी शेवटच्या दिवशी मागे घेतली आहे. उमेदवारी अर्ज माघार घ्यावयाच्या शेवटच्या दिवशी सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी निर्धारित वेळेत बावीस पैकी नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काँग्रेस पक्षात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर व त्यांच्या पत्नी संगीता पाटील यांनी आपलं उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानं काँग्रेस पक्षातील बंडखोरी रोखण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी 28 उमेदवाराने 46 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सहा जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले. तर 22 जणांचे उमेदवार अर्ज वैध केले होते. उमेदवारी अर्ज माघार घ्यावयाच्या शेवटच्या दिवशी सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अशोक पाटील निलंगेकर व संगीता अशोक पाटील निलंगेकर, शिवसेनाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लिंबंन महाराज रेशमे व डॉक्टर शोभा बेंदर्गे, सकल मराठा समाजाचे अंबादास जाधव, ईश्वर गायकवाड, कालिदास माने, अपक्ष शिवाजी पेठे यांच्यासह नऊ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
त्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे अभय सतीश साळुंखे, भाजपाचे संभाजी दिलीप पाटील निलंगेकर, बहुजन समाज पार्टीचे ज्ञानेश्वर साधू कांबळे,राष्ट्रीय मराठा पार्टीचे आकाश पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे नागनाथ बोडके, वंचित बहुजन आघाडीच्या मंजू हिरालाल निंबाळकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे हनुमंत धनुरे यांच्यासह सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी दिली आहे.