नव्या हिंदुस्थानी संघाचं उद्घाटन अटळ!

>> द्वारकानाथ संझगिरी

आज वानखेडेवर ‘लज्जास्पद’ शब्दाने लज्जेने मान खाली घालावी इतका लाजिरवाणा पराभव न्यूझीलंडने हिंदुस्थानचा केला. तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा व्हाइटवॉश… सॉरी वाईट वॉश केला.

 क्रिकेटच्या इतिहासात हिंदुस्थानचं इतपं तोंड काळं कुठल्याही संघाने हिंदुस्थानात केलं नव्हतं.

किती मोठमोठे फिरकी गोलंदाज हिंदुस्थानात येऊन गेले. उदाहरणार्थ रिची बेनॉ, लॉक, गिब्ज, अंडरवूड,  मुरलीधरन, शेन वॉर्न वगैरे वगैरे; पण कुणी लज्जेची इतकी  लक्तरं वेशीवर टांगली नव्हती. या फिरकी गोलंदाजांसमोर सॅण्टनर असो, एजाज असो किंवा फिलिप्स… ते इयत्ता दहावीचे थोडे हुशार विद्यार्थी वाटतात एवढेच. तरीही आपल्या देशात, आपण तयार केलेल्या खेळपट्टय़ांवर आपल्याच  चेंडूने जगाला ओरडून सांगितलं की, या हिंदुस्थानी संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही.

दिवाळी आपली, फटाके आपले, पण दिवाळी फटाके वाजवून साजरी केली न्यूझीलंडने.

मुंबई कसोटीच्या प्रत्येक दिवशी आपण परिश्रमाने आपल्या हाताने काढलेली सुंदर रांगोळी आपल्या चुकीने आपल्याच हाताने पुसून टाकली. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी खेळ संपायला पंधरा-वीस मिनिटं असताना असं वाटलं होतं की, चला आज हिंदुस्थानी संघ सुस्थितीच्या पालखीत बसून तंबूत परतणार. इतक्यात तंबूत घबराट झाली.

का झाली? ती आपण आपल्या शुभहस्ते घडवली. यशस्वी जैसवालने स्टंपचा वेध घेणारा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. का केला? त्याची लहर! त्यानंतर विराट कोहलीने अशी एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला की, जी फक्त जगातला सर्वात वेगवान स्प्रिंटर पूर्ण करू शकला असता. समोरून ट्रेन येत आहे हे दिसत असताना हट्टाने रूळ ओलांडण्यासारखा हा प्रकार होता. त्यामुळे अपघात अटळ होता. त्याला आत्महत्या असंच म्हणतात. ती विराटने केली.

IND vs NZ Test – हिंदुस्थानी बॉम्ब फुसकाच; न्यूझीलंडनेच साजरी केली दिवाळी

दर दिवशी असंच काहीतरी घडत गेलं. तिसऱया दिवशी 147 धावांचा जिंकण्यासाठी पाठलाग करत असताना आपली सुरुवात भयानक झाली, पण मग पंतने रांगोळी काढायला घेतली. त्यात विविध फटक्यांचे रंग भरायला सुरुवात केली. कधी पुढे जाऊन चेंडू फेकून देणे. कधी रिव्हर्स स्वीप, तर कधी त्याच्या स्वतःच्या पुस्तकातला स्वीप. पण तो मारताना चेंडूची त्याची निवड उत्तम होती. त्याने काही चांगले पूलही मारले. पुढे चेंडूची निवड चुकली आणि अचानक तो बाद झाला. तिथून जिंकायचा मार्ग अगदीच खडतर नव्हता; पण हिंदुस्थानी संघ कोसळण्याची संधीच शोधत होता. त्यांना ती सापडली आणि हिंदुस्थानी संघ संधीचं सोनं करत कोसळला. हा असा पराभव आहे की, ज्याचं खापर खेळाडू सोडून कुणावरही पह्डून टाकता येत नाही. ना पावसावर, ना खेळपट्टीवर, ना पंचांवर वगैरे. एखादा महत्त्वाचा खेळाडू जायबंदी आहे असंही पुढे करायला कारण नाही. ही सर्व जबाबदारी खेळाडूंची आहे… आणि सर्वात जास्त कर्णधार रोहित शर्माची.

त्याला किमान कसोटी क्रिकेटमध्ये शाल आणि श्रीफळ द्यायची वेळ आली आहे. त्याने वेळ निवडावी किंवा तो ती निवडायला तयार नसेल तर निवड समितीने अत्यंत निस्पृहपणे निर्णय घ्यावा. निवड समितीने अशी संधी ना पुजाराला दिली, ना रहाणेला दिली. तोच न्याय रोहितसाठी लावला जावा. या मालिकेत जवळपास प्रत्येक डावात त्याला वेगवान गोलंदाजाने स्क्वेअर अप केलं. म्हणजे गरकन फिरवलं. स्लिपचे क्षेत्ररक्षक चकोरासारखे तो देणाऱया झेलाची  वाट पाहत असत. शेवटच्या डावात त्यालाच एकाच प्रकाराने बाद होण्याचा पंटाळा आला असावा. केवळ व्हरायटी हवी म्हणून तो पूलवर बाद झाला. पण तेव्हा तो पूल मारण्याच्या नीट पोझिशनमध्येही नव्हता. याचा अर्थ त्याचे पाय आता पूर्वीसारखे हलत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर त्याची निवड झालेली आहे. तिथे तो जर धावा करू शकला तर ठीक, नाहीतर जनगणमन व्हायला हरकत नाही. आणि त्याने धावा केल्या तर त्याने निवृत्त व्हायची ही अत्यंत सुंदर संधी आहे असं म्हणून त्याने मानाने कसोटी क्रिकेटला अलविदा करावं.

ज्याप्रकारे सध्या विराट कोहली खेळतोय ते पाहिल्यावर तोसुद्धा शालीच्या दुकानापासून फार लांब नाही असं वाटायला लागतं. एकेकाळी आत्मविश्वास हा त्याचा सर्वात जवळचा मित्र होता. तो आता दुरावला आहे. आणि फिरकी गोलंदाजी खेळताना तो अधिक दुरावलेला वाटतो. त्याच्या फलंदाजीचा जीव हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे हे गुपित आता जगाला ठाऊक झालं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भार हा वेगवान गोलंदाजीवर असतो. त्यामुळे कदाचित त्याला तिथे डावाची सुरुवात वेगवान गोलंदाजीवर करता येईल आणि त्याचा आत्मविश्वास हळूहळू त्याला मिळू शकेल अशी आशा आहे. तरीही त्याच्यासाठी आता शाल निवडून ठेवायला हरकत नाही.

नव्या पिढीतले फलंदाज हे कसोटीतसुद्धा टी-20च्या नशेत वावरत असतात असं त्यांची फलंदाजी बघताना वाटतं. न्यूझीलंडचे फलंदाज हेसुद्धा तसे  टी- 20च्या पाळण्यात जन्म घेतलेलेच दिसताहेत. ते काही डायनासोरच्या काळात जन्म घेतलेले नाहीत. पण वेळप्रसंगी त्यांनी दमदार फलंदाजी केली. विल यंगची फलंदाजी पाहिल्यानंतर हा पिकल्या केसांचा फलंदाज असावा असं वाटतं. तो फलंदाजीला येताना फक्त केस काळे करत असावा.

हिंदुस्थानी फलंदाजांना मोठय़ा फटक्यांचा विरह फार काळ सहन होत नाही. आणि मग पतंग दिव्यावर झेप घेतो तशी ते झेप घेतात आणि जळतात. त्यातून कुणी शिकत नाहीय. मग तो जैसवाल असो किंवा गिल किंवा सरफराज खान.

अश्विन हा हिंदुस्थानी क्रिकेटमधला एक महान गोलंदाज नक्की आहे; पण त्यानेही त्याची सूत्रं वॉशिंग्टन सुंदरकडे सोपवण्याची वेळ झाली आहे. अलीकडे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतले तसे काही कठोर निर्णय हिंदुस्थानी निवड समितीने घ्यायची वेळ नुसती आलेली नाही, तर येऊन बराच वेळ झाला आहे.  ऑस्ट्रेलियन दौऱयाच्या आपण अगदीच उंबरठय़ावर उभे आहोत. संघही निवडला गेलाय. त्यामुळे या क्षणी फार काही करता येणार नाही. पण त्या दौऱयावरचा निकाल नक्की ठरवेल, किती शाली आणि नारळ यांची ऑर्डर द्यावी लागेल. तिथे मोठं अपयश मिळालं तर नव्या हिंदुस्थानी संघाचं उद्घाटन अटळ आहे.