>> मंगेश वरवडेकर
क्रिकेटमधला बॉम्ब असलेला ंिहंदुस्थानी संघ वानेखेडवर लवंगीपेक्षा फुसका ठरला. पुण्यात मालिका गमावल्यानंतर वानखेडेवरच्या प्रतिष्ठा बचाव मोहिमेत हिंदुस्थानचे कागदावरचे वाघ चवताळून उठतील आणि न्यूझीलंड फडशा पाडतील, अशी तमाम हिंदुस्थानींच्या आशाआकांक्षाचा ऐन दिवाळीत रोहित-विराटच्या टीमने चुराडा केला. न्यूझीलंडचा पराभव करण्यासाठी हिंदुस्थानला अवघ्या 147 धावांचा पाठलाग करायचा होता, पण नाम बडे असलेल्या खेळाडूंनी लाजेलाही लाज वाटेल अशी लज्जास्पद कामगिरी करत 121 धावांतच मान टाकली आणि अवघ्या देशाची मान शरमेने झुकवली. सलग तिन्ही कसोटी सामन्यांत न्यूझीलंडच्या जिगरबाज संघाने हिंदुस्थानचा 3-0 असा धुव्वा उडवत भीमपराक्रम केला.
अर्धा तास आणि अर्धा संघ गारद
न्यूझीलंडचा दुसरा डाव शनिवारच्या धावसंख्येत केवळ 3 धावांची भर घालून बाद झाल्यामुळे ंिहंदुस्थानला विजयासाठी केवळ 147 धावा करायच्या होत्या. आज हिंदुस्थानी संघ दिवाळीच फटाके पह्डणार म्हणून मुंबईकरांनी सकाळीच ‘चलो वानखेडे’चा नारा दिला होता. पण सकाळी जे काही घडले ते धक्कादायकच नव्हे तर अपमानजनकही होते. हजारोंची गर्दी वानखेडे स्टेडियमच्या चोहोबाजूला होती. साऱयांनाच आतमध्ये शिरण्याची घाई होती, पण स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर प्रेक्षकांच्या चेहऱयाचा रंग अक्षरशः उडाला होता. हिंदुस्थानची फलंदाजी सुरू होऊन अर्धा तासही झाला नव्हता, पण हिंदुस्थानचा अर्धा संघ वानखेडे सोडून पळाला होता. 5 बाद 29 ही दयनीय अवस्था एखाद्या काळीज पिळवटणाऱया कथेसारखी होती. अर्ध्या तासात अर्धा संघ बाद झाला असला तरी हिंदुस्थानने पूर्ण सामना तेव्हाच गमावला होता. त्यानंतर पुढच्या दीड तासात जो खेळ रंगला तो पराभव टाळण्यासाठी केलेला आटापिटा होता.
खूब लढा पंत…
29 धावांतच मान टाकलेल्या हिंदुस्थानी संघाला मान मिळवून दिला तो ऋषभ पंतने. या जिगरबाज खेळाने तासभर चिवट आणि आक्रमक खेळ करत सामना फिरवण्याची करामत दाखवली. रवींद्र जाडेजाबरोबर त्याने 42 धावांची भागी रचून संघाला आधी सावरले. पण जाडेजाची विकेट गेल्यावर हिंदुस्थान पुन्हा अडचणीत आला, पण पंत डगमगला नाही. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने 36 धावांची भर घालून हिंदुस्थानला शतकापलीकडे नेले. त्याचे चौकार-षटकार हिंदुस्थानी संघासाठी व्हेंटिलेटर्सचे काम करत होते. हिंदुस्थानी संघ विजयापासून केवळ 41 धावा दूर होता. तो चार-पाच षटकांत हे लक्ष्य गाठण्याचे डोक्यात ठेवून खेळत होता. पण अचानक एजाज अहमदच्या एका चेंडूने त्याला संशयास्पदरीत्या बाद केले. निर्णय तिसऱया पंचांनी दिला. तो निर्णय अचूक होता की नव्हता, याचा पुढील काही दिवस किस पडेल. पण पंतच्या या विकेटने हिंदुस्थानचा पराभव निश्चित केला. पंतने 57 चेंडूंत 64 धावा करताना न्यूझीलंडच्या फिरकीने चांगलेच चोपले. न्यूझीलंडच्या एजाज-फिलीप्सच्या फिरकीने उर्वरित तीन फलंदाज बाद करायलाही फार वेळ लावला नाही. पहिल्या डावात 5 विकेट टिपणाऱया एजाज अहमदने दुसऱया डावात 57 धावांत 6 विकेट घेत वानखेडेवर सलग दुसऱयांदा दहा विकेट बाद केले. तोच न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मालिकेत 244 धावा करणारा विल यंग ‘मालिकावीर’ ठरला.
सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यात अपयशी – रोहित शर्मा
आम्ही गेल्या तीन-चार वर्षांत आम्ही फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर खेळलो आहोत. त्या खेळपट्टीवर कसे खेळायचे, हे आम्हाला ठाउक आहे. पण या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाची स्पिन गोलंदाजी खेळून काढण्यात अपयश आले. त्यामुळे कसोटी मालिका 0-3 अशा फरकाने गमवल्याचे मोठे दुःख आहे. मी फलंदाज आणि कर्णधार म्हणून या मालिकेत अपयशी ठरलो आहे. ही गोष्ट माझ्यासाठी त्रासदायक असेल. त्याचबरोबर सर्वोत्तम सांघिक खेळ करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळेच आमचा पराभव झाला, असे कर्णधार रोहित शर्मा याने मालिका पराभवानंतर सांगितले.
एखादा कसोटी सामना गमावणे किंवा संपूर्ण मालिका पराभवाचे अपयश पचवणे कधीच सोपे नसते. ही गोष्ट सहजासहजी पचनी पडत नाही. आम्ही सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. हे आम्हाला स्वीकारावे लागेल. न्यूझीलंडने आमच्यापेक्षा खूप चांगली कामगिरी केली. आमच्याकडून खूप चुका झाल्या आहेत. भविष्यात त्याची पुनरावृत्ती टाळावी लागेल. बंगळुरूसह पुणे कसोटीत आम्ही पहिल्या डावात पुरेशा धावा केल्या नाहीत. पण मुंबईत आम्हाला छोटेखानी, परंतु 30 धावांची आघाडी मिळाली. त्याचा फायदा उठवण्यात अपयश आले. आमच्यासमोर तुलनेत माफक विजयी लक्ष्य होते, परंतु माझ्यासह आघाडी फळीतील फलंदाजांची खराब कामगिरी कायम राहिली आणि मोठय़ा मालिका पराभवाला सामोरे जावे लागले, असेही रोहित म्हणाला.
सर्वोत्तम सांघिक कामगिरीमुळे स्वप्न साकार – टॉम लॅथम
तीन आठवडय़ांपूर्वी आम्ही हिंदुस्थानात फक्त विजयाचे स्वप्न घेऊन आलो होतो. सर्वोत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवले, असे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने मालिका विजयानंतर म्हटले. 3-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकून खूप आनंद झाला आहे. आमच्या सर्व खेळाडूंनी संपूर्ण मालिकेतील चमकदार कामगिरी केली, त्याचेच हे फळ आहे. खेळाडूंनी ज्या प्रकारे परिस्थितीशी जुळवून घेतले ते कौतुकास्पद आहे, असे तो म्हणाला.
फिरकीपटूंचे यश वादातीत असले तरी पाहुण्या कर्णधाराने सर्वच गोलंदाजांना विजयाचे व्रेडिट दिले. वेगवान गोलंदाजांनी पण बंगळुरू कसोटीत चांगली कामगिरी केली होती. वेगवेगळय़ा खेळाडूंनी वेगवेगळय़ा वेळी चांगली कामगिरी केली, हेच सांघिक खेळाचे सौंदर्य आहे. मिचेल सँटनरने गेल्या आठवडय़ात आपली छाप सोडली होती. आता मुंबई कसोटीत एजाझ पटेलने कमाल केली. त्याला मुंबईत गोलंदाजी करायला आवडते. हे सांघिक मेहनतीचे यश आहे. आम्ही हिंदुस्थानी संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल थोडेसे समजून घेतले आणि सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न केला, असे टॉम लॅथमने सांगितले.
खेळता येईना, फिरकी भारी
हिंदुस्थानच्या या संघाचा फिरकीसमोर थरकाप उडतोय, हे आता कुणीही बोलू लागलाय. 147 धावांचा पाठलाग करतानाही हिंदुस्थानी दिग्गजांचा थरथराट पाहावला नाही. एजाज अहमद आणि ग्लेन फिलीप्स यांच्या बोटांना जादुई फिरकीचे वरदान लाभल्यासारखे त्यांचे चेंडू हातभर वळतही नव्हते. पण संयम आणि धीराला तिलांजली दिलेल्या संघाचे नाक याच फिरकीवीरांनी छाटले. रोहित शर्माने हिंदुस्थानी संघाला दरीत ढकलले. कोणत्या चेंडूला टोलवायचे आणि कोणत्या चेंडूला मान द्यायचा, हे विसरलेला रोहित या मालिकेत धावा करायलाही विसरला. त्याने संघाला खराब सुरुवात दिल्यानंतर बाकीचेही भेदरल्यागत खेळू लागले. शुबमन गिल पहिल्या डावात उभा राहिला, पण दुसऱया डावात त्याने विकेट गमावली. विराट कोहली तर जिद्द आणि संघर्ष गहाण ठेवून आल्यासारखा आला आणि गेला. त्याने आपल्या कारकीर्दीला धोक्यात आणले आहे. जैसवाल या डावात यशस्वी ठरला नाही. मात्र सरफराज खानने आपल्याला मिळालेल्या संधीची राख केली. त्याला सापळय़ात कसे अडकवायचे याचा फॉर्म्युला सापडलेल्या न्यूझीलंडने त्याला वानखेडेवरही उभे राहू दिले नाही. त्याचा खेळ पाहून त्याला किती संधी मिळेल, याबाबत शंका आहे. 29 धावांत अर्धा संघ बाद झाल्यावर साऱयांनाच भास झाला की न्यूझीलंडची फिरकी भारी आहे. पण वास्तव हिंदुस्थानी फलंदाजांना खेळताच येत नाही, हे आहे.