सँडलवरून बंटी बबली गजाआड 

गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळयातील सोनसाखळी चोरीप्रकरणी बंटी बबलीला दादर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रोशनी साईराज मोरे आणि साईराज भरत मोरे अशी त्या दोघांची नावे आहेत. सँडल आणि स्कूटीवरून पोलीस त्या दोघांपर्यंत पोहचले. रोशनी ही चोऱ्या करण्यासाठी बुरखा वापरत असायची, तर साईराज हा चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी मदत करत असायचा.

बदलापूर येथे एक महिला राहते. गेल्या आठवड्यात त्या दादर स्थानकातून कर्जतला जाणारी लोकल पकडत होत्या. महिलांच्या डब्यात त्या चढत होत्या. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्याचे मंगळसूत्र घेऊन पळ काढला. घडल्याप्रकरणी त्याने दादर रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे, उपनिरीक्षक रमेश सिद्राम सूर्यवंशी आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एक महिला ही बुरखा घालून दिवा स्थानक येथून प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दिवा स्थानक आणि दिवा शहरातील काही इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ती इमारतीमधून बाहेर पडताना तिच्याकडे बुरखा नसायचा. ती एका स्कूटीवरून निघून जायची. पोलिसांना एक फुटेजमध्ये तिची सँडल दिसली. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी त्या सँडलवर लक्ष केंद्रित करून तपास पुढे नेला.

सीसीटीव्हीमध्ये स्कूटीचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता. सँडलचे मार्क असणारी स्कूटी पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रोशनीला ताब्यात घेतले. तिच्या चौकशीत साईराजचे नाव समोर आले. त्या दोघांनादेखील पोलिसांनी अटक केली. काही महिन्यांपूर्वी रोशनीला रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून ठाणे आणि कुर्ला येथील सहा गुन्ह्यांची उकल केली होती.

झटपट श्रीमंतीची करायचे चोऱ्या

रोशनी ही सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस बुरखा घालून चोऱ्या करायची. पोलिसांनी पकडू नये म्हणून ती दिवा येथील इमारतीत जायची. कपडे बदलण्याचा बहाणा करून ती बुरखा बॅगेत ठेवायची. तेथे साईराज हा तिची मोटरसायकलवर वाट पाहत उभा असायचा.