123 वर्षांत सर्वाधिक उष्ण ठरला यंदाचा ऑक्टोबर, किमान तापमानाचा संपूर्ण देशभरात ‘विक्रमी’ कहर

यंदाचा ऑक्टोबर मागील तब्बल 123 वर्षांतील सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर महिना ठरला आहे. मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात किमान तापमानाने विक्रमी कहर केला. या महिनाभरात रात्री ते पहाटेच्या सुमारास किमान तापमानात सरासरी 1.23 अंशांची मोठी वाढ झाली होती. यापूर्वी 1901 च्या ऑक्टोबरमध्ये देशवासीयांनी सर्वाधिक उष्णता अनुभवली होती.

गेल्या महिन्यात संपूर्ण देशभरात किमान तापमान सरासरी 26.92 अंशांच्या पातळीवर गेले होते. ही वाढ 1.23 अंशांची वाढ असल्याचे हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. सर्वसाधारणपणे ऑक्टोबरमध्ये दिवसा जास्त तापमान असते. मात्र रात्री आणि सकाळी थंडी असते. यंदा मात्र थंडीचा अद्याप थांगपत्ता नाही. संपूर्ण देशभरात ही परिस्थिती आहे. त्यामुळे मागील महिनाभर किमान तापमानाने 123 वर्षांतील विक्रमी पातळी गाठली.

मुंबईचा पारा 37 अंशांवर

रविवारी मुंबईचा पारा थेट 37 अंशांवर झेपावला. कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची मोठी वाढ झाली. याचवेळी किमान तापमानही 23 अंशांवर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांची सकाळपासून संपूर्ण दिवसभर लाहीलाही झाली.

ऑक्टोबरमध्ये पूर्व आणि ईशान्य हिंदुस्थानात सामान्य पावसाची (14.3 टक्के) नोंद झाली, तर दक्षिण हिंदुस्थानात सरासरीपेक्षा अधिक (11.8 टक्के) पाऊस पडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्यात दिवस व रात्रीचे तापमान सामान्य पातळीपेक्षा अधिक राहणार आहे.