बेस्ट आणि एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, बोनससाठी कर्मचारी संघटना कोर्टात

best_undertaking_logo

निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी लाडकी बहीण योजनेत महिलांना आगाऊ पैसे देऊन मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने एसटी तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मात्र त्यांचा हक्काचा बोनसही दिलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे अग्रीम रक्कम वा उचलही देण्यात आली नसल्यामुळे लाखो एसटी कर्मचारी तसेच बेस्टच्या कुटुंबीयांची दिवाळी अंधारात साजरी झाली आहे.

लाडकी बहीण योजनेतून कोणतीही उत्पादक गोष्ट निर्माण होणार नाही, परंतु लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे घसरलेली पत सावरण्यासाठी सरकारने ही योजना आणली, परंतु यामुळे राज्यातील जनतेच्या डोक्यावर वर्षाकाठी 48 हजार कोटी रुपयांचा बोजा येणार आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या जाहिरातबाजीवरही सरकारने शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये बोनस देण्यासाठी अवघे 60 ते 70 कोटी रुपये लागणार होते, परंतु तेवढी ही रक्कम राज्य सरकारने उपलब्ध करून दिली नाही.

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचे मुंबई जनता दल व महाराष्ट्र श्रमिक सभेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, केतन कदम, सलिम भाटी, प्रशांत गायकवाड, संजीवकुमार सदानंद यांनी सांगितले. राज्य सरकारने निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन बोनस आणि अग्रीम रकमेसाठी लागणारी रक्कम एसटी महामंडळाला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही या सर्वांनी केली आहे. अशाच पद्धतीने बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा बोनस मिळाला नसल्याची माहिती बेस्ट जागरूक कामगार संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांनी दिली असून याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला साधारण 12 हजार 500 रुपये उचल व पाच हजार रुपये बोनस दिला जातो. या वर्षी सहा हजार रुपये बोनस देण्याचे महामंडळाच्या अध्यक्षांनी मान्य केले होते, परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या फारशी चांगली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बोनस वा उचल देण्यासाठी राज्य सरकारने मदत करायला हवी होती, परंतु मतांची बेगमी करण्यासाठी राज्यभरातील महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा रमणा वाटणाऱ्या महायुती सरकारने सणासुदीलाही प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीच्या लाखभराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

दैनंदिन प्रवासी उत्पन्नातून रक्कम द्यावी

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम देण्यात सरकारी अधिकारी व एसटी प्रशासन दोघेही कमी पडले. महामंडळाला मंजूर करण्यात आलेली 6 हजार रुपयांची रक्कम दैनंदिन प्रवासी उत्पन्नातून देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.