गुजरात प्रेमामुळे गल्लत, रोहित पवारांची आशिष शेलार यांच्यावर टीका

गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न कमी झाल्याचे वृत्त एका मराठी दैनिकात प्रसिद्ध झाले होते. ही बातमी शेअर करत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर आशिष शेलार यांनी फेक नरेटिव्ह पसरल्याचा आरोप केला होता. त्यावर रोहित पवार यांनी आशिष शेलार यांना गुजरात प्रेमामुळे गल्लत केली अशी टीका केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्याचे सकल उत्पन्न कमी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला होता. एका मराठी दैनिकाचे वृत्त शेअर करत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्यावर आशिष शेलार यांनी रोहित पवार फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हटले. रोहित पवार यांनी शेलार यांना उत्तर देताना म्हटले की, प्रिय, आशिष शेलार जी,

हा अहवाल वाचत असताना आलेख वाचताना कदाचित आपली गल्लत झालेली दिसते. गुजरात प्रेमाच्या चष्म्यामुळे ही गल्लत झालेली असावी. आपण गुजरात प्रेमाचा चष्मा बाहेर काढून उघड्या डोळ्यांनी नीट बघितलं तर तुम्हाला तुमच्या सरकार काळात महाराष्ट्राची झालेली पीछेहाट स्पष्ट दिसेल. तरीही एक मित्र म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो , 2014-15 नंतर महाराष्ट्राचा जीडीपीमधील वाटा मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे.Relative per capita income चा ग्राफ बघितला तर त्यामध्ये देखील 2014 नंतर महाराष्ट्राचा ग्राफ खालावला आहे तर गुजरातचा ग्राफ उंचावलेला स्पष्ट दिसतो.असो, देवेंद्र फडणवीस साहेबांची बाजू मांडण्यासाठी आपण पुढे आलात याचे आश्चर्य वाटले आणि आनंद देखील आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.