नगरमध्ये निवडणूक आयोगाने जप्त केले 24 कोटी रुपयांचे दागिने, मुंबईहून निघाली होती गाडी

फोटो प्रतिनिधीक

एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सूरू आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाची स्टेटिक सर्विलान्स टीम डोळ्यांत तेल घालून काम करत आहे. नगरमध्ये आयोगाच्या स्टेटिक सर्विलान्स टीमने 24 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहे. या दागिन्यांमध्ये सोनं, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

नगरच्या सुपा टोल नाक्यावर गुरुवारी एक गाडी अडवली गेली. या गाडीची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दागिने सापडले. दक्षिण मुंबईच्या जवेरी बाजारातून ही गाडी निघाली होती.

या गाडीत तीन जण प्रवास करत होते. पोलिसांनी या तिघांकडे या दागिन्यांची पावती मागितली. या पावतीवर या दागिन्यांची जी किंमत होती ती किंमत जुळत नव्हती. म्हणून आयोगाच्या टीमने हे सर्व दागिने जप्त केले आणि आयकर विभागाला याबाबत माहिती दिली. हिरे, सोने आणि चांदीचे असलेल्या या दागिन्यांची किंमत 24 कोटी रुपयांच्या घरात आहेत.

छत्रपती संभाजीनगर, नगर आणि जळगावमध्ये हे दागिने पोहचवायला या आरोपींना सांगितले होते. यापूर्वी आयोगाच्या टीने पोलिसांसोबत मरीन ड्राईव्हवर एका गाडीतून 10 कोटी रुपयांचे परेदेशी चलन जप्त केले होते.