जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपची दिवाळी!, रमेश चेन्नीथला यांचा हल्लाबोल

भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या तसेच केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन, कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपची दिवाळी सुरु आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत वंचित आघाडीचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी शनिवारी काँग्रेस पक्षात प्रवेश करत घरवापसी केली. तसेच अंधेरी मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलेले काँग्रेस नेते मोहसीन हैदर यांनी प्रभारी रमेश चेन्नीथला यांना भेटून आपण अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू असे सांगितले.

यावेळी माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर सडकून टिका केली. केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि व्यापारी धार्जिण्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. राज्यातला शेतकरी सुखी, समाधानी आणि समृद्ध करायचा असेल तर राज्यातील महायुतीने भ्रष्ट सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणावे लागेल असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

यावेळी चेन्नीथला यांच्या हस्ते काँग्रेसच्या नव्या व्हिडीओ जाहिरातीचे अनावरण करण्यात आले. या जाहिरातीत केंद्र आणि राज्यातल्या शेतकरीविरोधी धोरणांना लक्ष्य केले आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात 20 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पिकाची नुकसान भरपाई मिळाली नाही आणि हमीभावाच्या वचनांचा फोलपणा सिद्ध झाला, या मुद्द्यांवर जाहिरातीत भर दिला आहे.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, सचिव श्रीकृष्ण सांगळे, श्रीरंग बर्गे आदी उपस्थित होते.