हा प्रकार फक्त ब्लॅकमेलिंगचा नाही, सिंचन घोटाळ्याप्रकरणी जयराम रमेश यांची चौकशीची मागणी

 

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केली होती असे विधान अजित पवार यांनी केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ती फाईल मला दाखवली होती असेही पवार म्हणाले होते. त्यावर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

एक्सवर पोस्ट करून जयराम रमेश म्हणाले की, भाजपची वॉशिंग मशीन संपूर्ण देशभरात कार्यरत आहे. पण महाराष्ट्रात जरा जास्तच जोरात काम सुरू आहे. एनडीएत येण्यासाठी ब्लॅकमेल केलं होतं याला खुद्द अजित पवारांनी दुजोरा दिला आहे.

2014 पूर्वी भाजप विरोधी पक्षात होते. तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केला होता. खुद्द नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यात आणि केंद्रात त्यांचा प्रिय सहकारी पक्ष आहे या पक्षाला मोदींनी भ्रष्ट पार्टी म्हटलं होतं.

सिंचन घोटाळ्याची फाईल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दाखवली होती असे विधान आताच अजित पवार यांनी केले होते. आमच्या सोबत या अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी भाजपने अजित पवारांना ऑफर दिली होती. हा गंभीर प्रकार आहे. यात फक्त जोर जबरदस्ती आणि ब्लॅकमेलच नाही तर गोपनीयतेचाही भंग करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.