शिस्तबद्धतेचा टेंभा मिरवणाऱया भाजपकडून होणाऱ्या गळचेपीवर बोट ठेवत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष नेतृत्वाने लादलेल्या उमेदवाराविरोधात शड्डू ठोकला आहे. निष्ठावंतांची किंमत शून्य करणाऱयांनी आधी कार्यकर्त्यांचे काय? या प्रश्नाचे उत्तर द्यावे नाहीतर या निवडणुकीत जागा दाखवून देऊ, असा निर्धार पेठ वडगाव येथे झालेल्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. यामुळे हातकणंगलेत भाजपमधील खदखद चव्हाटय़ावर आली आहे.
भाजपच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पेठ वडगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्यासाठी पाचशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पंचायत राज व ग्रामविकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाटील होते.
सुधाकर पिसे म्हणाले, आम्ही खासदारकी दिली, आमदारकी दिली, विविध समित्यांवरही मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागते. निवडणुकीनंतर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीही तेच घेणार असतील तर आम्ही कार्यकर्ते म्हणून राहायचेच कशाला, असा सवाल उपस्थित करून, ‘आधी कार्यकर्त्यांचे काय ते ठरवा; मग तुमच्या निवडणुकीचे पाहू’, असा इशारा दिला.
संतोष घोडेस्वार म्हणाले, ‘सत्ता आहे तोपर्यंत कुणीही येईल; पण भाजपला भविष्यात निष्ठावंत कार्यकर्ते मिळणार नाहीत. कोल्हापूर जिह्यात संघटना सक्षम असताना भाजपचा उमेदवार नाही त्यामुळे पक्ष जिवंत राहणार नाही. बाहेरच्या लोकांनी येऊन पक्ष बळकावला असून, ज्यांनी आयुष्याची तीस-तीस वर्षे पक्षाला दिली आहेत, त्यांची किंमत शून्य करून टाकली आहे.
यावेळी संजय पाटील, विजय शहा, राजाराम माने, दिगंबर पोळ, सुधाकर पिसे बाबासाहेब अनुसे, विकास कांबळे, युवराज वाळवेकर यांची भाषणे झाली. मेळाव्यास पंचायत राजचे जिल्हाध्यक्ष दीपक रानमाळे, तालुकाध्यक्ष सतीश पाटील, सिद्राम माडग्याळ, नामदेव साळोखे, परशुराम चव्हाण, आनंदा थोरवत, बंडा गोंदकर, श्रीकांत ठिगळे आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपत आयारामांची चलती – सयाजी पाटील
माजी जिल्हा उपाध्यक्ष सयाजी पाटील म्हणाले, हातकणंगले तालुक्यात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुणी वाली नाही. सत्ता येऊन दहा वर्षे झाली तरी कार्यकर्त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. फक्त आयारामांचीच चलती सुरू आहे. मूळ कार्यकर्ता बाजूला फेकला गेला आहे. निवडणूक आली की नेत्यांना कार्यकर्ते आठवतात. त्यांच्या सुख-दुःखात कुणीही सहभागी होत नाहीत. निवडणूक आली की बूथप्रमुखांपुढे चार पैसे फेकले की काम झाले, हे आता थांबले पाहिजे.