‘स्वाभिमानी’च्या अनेक निष्ठावंत शिलेदारांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या साखरपट्टय़ात संघटना आणि पक्षाचे काम कायम तेवत ठेवले. पण, चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारात न घेताच, एकाधिकारशाहीपणे राजू शेट्टी परस्पर निर्णय घेत आहेत, असा आरोप करत लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी ‘चळवळ टिकली पाहिजे’, अशी टॅगलाईन केली होती. त्याचा संदर्भ देत आता त्याऐवजी ‘चळवळ विकणे आहे’, अशी करावी, असा टोला ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी लगावला.
राजू शेट्टी यांनी आपल्यासोबत येऊन हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण एका रात्रीत असा काय बाजार झाला की त्यांनी बाहेरून आलेल्या माजी आमदार सुजित मिणचेकर यांना उमेदवारी देऊन आपल्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेता डावलले, असा सवाल करत, चळवळ टिकण्यासाठी काहीही करण्याची हिम्मत दाखवणाऱया आपल्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करून, हातकणंगलेमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला शिवाजी आंबेकर, सुनील पवार, सुहास लाटवडेकर, माणिक कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांत एकही दिवाळी कुटुंबीयांसोबत साजरी करता आली नाही. प्रसंगी तुरुंगवास भोगला; पण विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला माझा नेता एका रात्रीत बदलला. शेतकऱयांची चळवळ नेमकी कोणाच्या बांधाला गहाण टाकली, असा सवाल करत वैभव कांबळे यांनी राजू शेट्टी यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पदाचा राजीनामा दिला. यामुळे ऊसपट्टा असलेल्या कोल्हापूर, सांगली जिह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षात ऐन विधानसभा निवडणुकीत उभी फूट पडली आहे.