बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करा; छळवणूक थांबवा, 30 हजार हिंदूंचा भव्य मोर्चा

बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने अत्याचार आणि हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील हिंदूंचे संरक्षण करा, छळवणूक बंद करा, अशी मागणी बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडे करत आज तब्बल 30 हजार हिंदूंनी भव्य मोर्चा काढला. दक्षिणपूर्व भागातील शहरांमध्ये हिंदूंवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले होत असून याच ठिकाणी आज हजारो हिंदूंनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी सरकारकडे केली. यावेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस आणि लष्करातील जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. देशभरात अनेक भागात अशाप्रकारे सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली.

ऑगस्टपासून बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत, असा दावा देशातील हिंदू संघटनांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात उठाव करून त्यांना देश सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर हिंदूंवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले होत असल्याचे हिंदू संघटनांनी म्हटले आहे. दरम्यान,  देशात हिंदूंची संख्या 8 टक्के म्हणजेच 1 कोटी 70 लाख इतकी आहे, तर मुस्लिमांची संख्या तब्बल 91 टक्के आहे.

अमेरिकेतील हिंदूंचे संरक्षण करू डोनाल्ड ट्रॅम्प

अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न उमेदवारांनी सुरू केले आहेत. दिवाळीचा मुहूर्त साधत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हिंदुस्थानींना शुभेच्छा देत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे.  हिंदुस्थान आणि अमेरिकेतील भागीदारी आणखी मजबूत करण्याचे आणि अमेरिकेतील हिंदूंचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.