पाकिस्तानने पारंपरिक प्रतिस्पर्धी हिंदुस्थानचा हाँगकाँग सुपर-6 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी (दि. 1) 6 फलंदाज आणि 6 चेंडू राखून पराभव केला. पाकिस्तानने गट फेरीत दोन्ही सामने जिंकून पुढील फेरीतील आपले स्थान पक्के केले. हिंदुस्थानचा दुसरा सामना अद्याप बाकी आहे. हा सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना जिंकणारा संघच पुढील फेरी गाठू शकेल.
सहा षटकांच्या या स्पर्धेत हिंदुस्थानकडून मिळालेले 120 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने एकही फलंदाज न गमविता 5 षटकांत 121 धावा करून सहज पूर्ण केले. मुहम्मद अख्लाख (नाबाद 40) व असिफ अली (55) यांनी पाकिस्तानसाठी जोरदार सलामी दिली. असिफने 14 चेंडूंत 7 षटकार व 2 चौकारांसह 55 धावांची धडाकेबाज खेळी केली. तो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर कर्णधार फहीम अश्रफने 5 चेंडूंत 3 षटकार व एका चौकारासह नाबाद 22 धावा करीत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सलामीवीर मुहम्मद अख्लाखने 12 चेंडूंत 4 षटकार व 3 चौकारांसह नाबाद 40 धावांची खेळी सजवली. हिंदुस्थानकडून स्टुअर्ट बिन्नी, केदार जाधव, शाहबाझ नदीम व मनोज तिवारी हे सर्वच गोलंदाज महागडे ठरले.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 6 षटकांत 2 बाद 119 धावसंख्या उभारली. कर्णधार रॉबिन उथप्पा (31) व भारत चिपली (53) यांनी हिंदुस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली. उथप्पाने आपल्या 31 धावांच्या खेळीत 8 चेंडूंत 3 षटकारांसह तितकेच चौकार ठोकले. फहीम असीफने त्याला बाद केले. भारत चिपलीने रिटायर्ड हर्ट होण्यापूर्वी 16 चेंडूंत 6 चौकारांसह 4 षटकारांचा घणाघात केला. केदार जाधव 8 धावांवर बाद झाल्यानंतर मनोज तिवारी 17, तर स्टुअर्ट बिन्नी 4 धावांवर नाबाद राहिले. पाकिस्तानकडून फहीम असीफनेच दोन्ही बळी टिपले.