हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यानच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दिवाळीच्या दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रथी-महारथी फलंदाजांचा फुसका बार बघायला मिळाला. मात्र दोन्ही संघांतील गोलंदाजांनी धमाका करीत पहिल्या दिवशी तब्बल 14 बळी टिपले. न्यूझीलंडने पहिल्या डावात 65.4 षटकांत 235 धावसंख्या उभारली. यात विल यंग (71) व डॅर्ली मिचेल (82) यांनी अर्धशतकी फटाके फोडले. हिंदुस्थानकडून रवींद्र जाडेजाने 5, तर रविचंद्रन अश्विनने 4 बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानची उर्वरित 19 षटकांत 4 बाद 86 अशी दुर्दशा झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुबमन गिल 31, तर ऋषभ पंत 1 धावेवर खेळत होते. हिंदुस्थानचा संघ पहिल्या डावात अजूनही 149 धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे 6 फलंदाज शिल्लक आहेत.
यंग, मिचेलने फोडले अर्धशतकी फटाके
त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची अडखळती सुरुवात झाली. वेगवान गोलंदाज आकाश दीपने चौथ्या षटकांत डेवोन क्वॉन्वेला (4) पायचित पकडून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. मग वॉशिंग्टन सुंदरने 16 व्या षटकांत कर्णधार टॉम लॅथमचा (28) त्रिफळा उडवून 59 धावांत न्यूझीलंडची सलामीची जोडी तंबूत पाठवली. मग सुंदरने रचिन रवींद्रचा (5) स्वस्तात त्रिफळा उडवून हिंदुस्थानला तिसरे यश मिळवून दिले. मग विल यंग (71) व आलेला डॅर्ली मिचेल (82) यांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी करीत न्यूझीलंडचा डाव सावरला.
अखेर रवींद्र जाडेजाने 45व्या षटकांत यंगला रोहितकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली.
रोहित, विराटचा फ्लॉप शो
न्यूझीलंडला पहिल्या डावात 235 धावसंख्येवर गुंडाळल्यानंतर हिंदुस्थानची सुरुवातही निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्माने (18 धावा) सातव्या षटकांतच विकेट फेकली. मॅट हेन्रीच्या एका उसळत्या चेंडूवर त्याने स्लीपमध्ये लॅथमकडे झेल दिला. पहिल्या चेंडूपासून संयमाने खेळणाऱ्या यशस्वी जैसवालने 52 चेंडूंत 30 धावा करताना 4 चौकार लगावले. एजाज पटेलने त्याचा त्रिफळा उडवला. दोन षटकांचाच खेळ शिल्लक असल्याने मोहम्मद सिराज ‘रात्रीचा रखवालदार’ म्हणून फलंदाजीला आला, मात्र पटेलच्या पुढच्याच चेंडूवर भोपळाही न फोडता तो पायचित झाला. त्यामुळे नाइलाजाने विराट कोहलीला फलंदाजीसाठी यावे लागले. रचिन रवींद्रच्या दिवसभरातील अखेरच्या म्हणजे 19 व्या षटकांत विराट कोहली अवघ्या 4 धावांवर दुर्दैवीरीत्या धावबाद झाला अन् वानखेडे स्टेडियमवर एकच सन्नाटा पसरला. मॅट हेन्रीने एका अप्रतिम फेकीवर विराटला धावबाद केले अन् हिंदुस्थानी फलंदाजीवर दडपण आले. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने 2, तर मॅट हेन्रीने एक बळी टिपला.
जाडेजाचा ‘सुंदर मारा’
रवींद्र जाडेजाने मधळी फळी कापून काढल्याने डॅर्ली मिचेलला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. जाडेजाने टॉम ब्लंडेल (0), ग्लेन फिलिप्स (17), ईश सोढी (7) व मॅट हेन्री (0) यांना स्वस्तात बाद करीत न्यूझीलंडला पहिल्या दिवशी गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. यात त्याने सोढीला पायचित पकडले, तर इतर तीन फलंदाजांचा त्रिफळा उडवला. डॅर्ली मिचेलने एका बाजूने किल्ला लढवताना 129 चेंडूंत 82 धावा करताना 3 षटकारांसह तितक्याच चौकारांचा घणाघात केला. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्यासह एजाज पटेलला (7) बाद करीत न्यूझीलंडचा डाव संपविला. विल्यम्स ओ’रौर्के 1 धावेवर नाबाद राहिला. हिंदुस्थानकडून जाडेजाने 65 धावांत 5, तर सुंदरने 81 धावांत 4 बळी टिपले. आकाश दीपलाही एक बळी मिळाला.