तुम्हीच ठरवा, एक उमेदवार! जरांगेंचे इच्छुकांना आवाहन

मराठा समाजाने निवडणुकीत गाफील न राहता आपली ताकद दाखवावी, असे आवाहन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी आता निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हीच एक उमेदवार ठरवा, असे जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांना म्हटले आहे. राज्यातील काही भागांत उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत, त्यांना जरांगे यांनी हे आवाहन केले आहे. शुक्रवारी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांनी निवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मराठा बांधवांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्यात ज्यांनी आमच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्या व या बैठकीत सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. आपल्यासाठी ही चांगली संधी आलेली आहे. ओढातानीच्या नादात ही संधी घालवू नका, असेही जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांना म्हटले. त्यामुळे आता मनोज जरांगे हे विधानसभेच्या रणांगणात उतरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.