लेख – बॉम्बच्या खोट्या धमक्या; नवा दहशतवाद

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

गेल्या आठवड्यामध्ये भारताला एका नवीन प्रकारच्या दहशतवादाला सामोरे जावे लागले. विमाने किंवा विमानतळावर बॉम्ब ठेवला असल्याच्या  धमक्यांमुळे विमान कंपन्यांना पंधराशे ते दोन हजार कोटी एवढा अतिरिक्त खर्च करावा लागला. झालेले नुकसान सोशल मीडिया कंपनी आणि धमक्या देणाऱ्यांकडून वसूल केले पाहिजे. खोटय़ा धमकीसाठी किंवा बॉम्ब असल्याचा फसव्या कॉलसाठी सरकारने अशा गुन्हेगारांचा समावेश नो-फ्लाय लिस्टमध्ये केला पाहिजे.

भारत हा जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणाऱ्या हवाई वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांद्वारे भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे विमान उड्डाणांना आणि व्यवसायाला प्रचंड फटका बसला आहे. भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करत या महिन्यात आतापर्यंत अनेक खोट्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या एका आठवडय़ातच अशा किमान 90 धमक्या देण्यात आल्या होत्या.

जून महिन्यात एकाच दिवशी 41 विमानतळांना ई-मेलद्वारे विमानात किंवा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या खोट्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. निम्म्या धमक्या दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन सर्वात मोठ्या विमानतळांच्या बाबतीत होत्या.

मागील काही वर्षांपासून भारतातील हवाई सेवा क्षेत्रात प्रचंड विस्तार होत आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी भारतात देशांतर्गत विमान उड्डाणांमधून 15 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. देशातील 33 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह 150 हून अधिक कार्यरत विमानतळांवर भारतात दररोज 3,000 हून अधिक विमानं येतात आणि जातात. गेल्या आठवडय़ात बॉम्बसंदर्भातील अफवा शिगेला पोहोचल्या असताना 14 ऑक्टोबरला भारतातील विमान कंपन्यांनी 4,84,263 प्रवाशांची वाहतूक केली. देशात एकाच दिवसात इतक्या प्रवाशांची वाहतूक करण्याचा हा एक विक्रम आहे. भारतात 700 व्यावसायिक प्रवासी विमानं सेवेत आहेत, तर 1,700 हून अधिक विमानांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.

भारत ही नक्कीच व्यावसायिक विमानांची सर्वात वेगानं विस्तारणारी बाजारपेठ होईल. मात्र अशा प्रकारच्या खोट्या बॉम्बच्या माहितीमुळे किंवा अफवांमुळे या क्षेत्राला फटका बसत आहे. विमान कंपन्यांना आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. बॉम्ब असल्याची धमकी किंवा माहिती मिळाल्यानंतर जर विमान आकाशात असेल तर त्याला लगेच जवळच्या विमानतळाकडे न्यावं लागतं. धोक्याची माहिती दिलेल्या विमानांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी लढाऊ विमानांचाही वापर करावा लागतो. एकदा का विमान विमानतळावर उतरलं की, प्रवासी विमानातून उतरतात. त्यानंतर विमानातील सर्व सामान, माल आणि खाद्य पदार्थांची कसून तपासणी केली जाते. या प्रक्रियेसाठी कित्येक तास लागू शकतात. विमानातील पायलट असो किंवा इतर कर्मचारी असोत, त्यांच्या कामाचे तास ठरलेले असतात. त्या मर्यादेपेक्षा अधिक तास ते काम करू शकत नाहीत. परिणामी विमानातील सर्व कर्मचाऱ्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागते. यातून विमानाच्या उड्डाणास आणखी विलंब होतो. या सर्व प्रक्रियेसाठी मोठा खर्च होतो आणि विमान वाहतुकीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

नियोजित मार्गावरून इतरत्र वळवण्यात आलेल्या किंवा विलंब झालेल्या विमानामुळे, विमानतळावर उभ्या असलेल्या विमानामुळे विमान कंपनी महसूल कमावत नसते, तर त्यांचा अतिरिक्त खर्च करते. त्यामुळे ते विमान उड्डाण कंपनीसाठी पैसे गमावणारं ठरतं. विमान उड्डाणास विलंब झाल्याने त्याचा वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो.

सोशल मीडियावरील निनावी अकाऊंटवरून टाकण्यात येणाऱ्या बॉम्ब अफवांमध्ये नाट्य़मयरीत्या वाढ झाल्यामुळे यासाठी जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. ही धमकी एखाद्या व्यक्तीनं दिली आहे की एखाद्या संघटनेनं दिली आहे, की कोणीतरी याची नक्कल करत आहे याबद्दल स्पष्टता नाही. गेल्या आठवडय़ात भारतीय अधिकाऱ्यांनी एका 17 वर्षांच्या शाळा सोडलेल्या मुलाला अटक केली होती. सोशल मीडियावरील या पोस्ट कुठून टाकण्यात आल्या याचा तपास करताना आयपी अ‍ॅड्रेसचा (IP addresses) शोध घेतला असता काही पोस्टचा उगम लंडन आणि जर्मनीहून झाला आहे. बॉम्ब असल्याच्या अशा खोट्या धमक्यांमागे कोण आहे याचा छडा लावणं हे एक मोठं आव्हान आहे. सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना ताकीद दिली आहे की, अशा प्रकारच्या पोस्ट किंवा मेसेजेस सोशल मीडियावर लगेच ब्लॉक झाल्या पाहिजेत आणि अशा पोस्ट व्हायरल होऊ देऊ नयेत. कारवाई न केल्यास सरकार सोशल मीडियावर कारवाई करेल.

अजून एक बातमी आली की, आता काही मोठ्या शहरांतील मोठ्या हॉटेल्सना धमकी मिळत आहे की, त्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. म्हणजे आपण एका दहशतवादाच्या प्रकाराला सामोरे जात असताना दुसरा दहशतवादाचा प्रकार पुढे येत आहे. म्हणून सरकारने आक्रमक कारवाई करून अशा सगळ्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना अत्यंत कठीण अशी शिक्षा द्यायलाच पाहिजे, नाहीतर अशा प्रकारच्या धमक्या आणि अफवा पसरवणे थांबणार नाही. खोट्या धमकीसाठी किंवा बॉम्ब असल्याचा फसव्या कॉलसाठी सरकार अशा गुन्हेगारांचा समावेश नो-फ्लाय लिस्टमध्ये म्हणजे त्यांना विमान प्रवास करण्यास प्रतिबंध करण्याबरोबरच या गुह्यांसाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करणारे नवीन कायदे आणण्याचा विचार करत आहे.

[email protected]