सामना अग्रलेख – खोकेबाज नरकासुर गाडू… फटाके राखून ठेवा!

दिवाळीबरोबरच महाराष्ट्रात निवडणुकांचा धूमधडाका सुरू आहे. राज्यकर्त्यांच्या रूपाने खोकेबाज नरकासुरांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालेला आहे. विश्वासघात व गद्दारीची जळमटे सर्वत्र लटकलेली दिसत आहेत. मराठी जनतेच्या तोंडचा घास काढून महाराष्ट्रातील उद्योगधंदे राज्याबाहेर पळवले जात आहेत. 8 लाख कोटींचे कर्ज करून महाराष्ट्राचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न दिल्लीच्या हुकूमावरून सुरू आहे. महाराष्ट्राला ओरबाडणाऱ्या नरकासुरांना  गाडण्यासाठी दिवाळीनंतरच्या निवडणुकीत मराठी जनतेला मोठीच साफसफाई करावी लागेल. त्यासाठी दिवाळीनंतरही फटाके राखून ठेवावे लागतील. खोकेबाज सरकारच्या खुर्चीखाली ‘आवाज’ काढावाच लागेल! 

वर्षानुवर्षे, शतकानुशतके आनंदाची पखरण करणारा दिवाळीचा चैतन्यदायी सण सुरू झाला आहे. तमाम हिंदूंची घरे पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली आहेत. गाव-खेड्यांपासून महानगरांपर्यंत घराघरांतील अंगणांत व बाल्कनींमध्ये आकाशपंदील सजले आहेत. आखीव-रेखीव व रंगीबेरंगी रांगोळय़ांनी अंगणांचे सौंदर्य वाढवले आहे. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे घर असो, श्रीमंतांचा बंगला असो, की गरिबाची झोपडी, प्रत्येक लहान-मोठ्या घरांचे सारे उंबरठे दिव्यांनी प्रकाशमान झाले आहेत. दिवाळीपूर्वी घरोघरी स्वच्छता मोहीम राबवून जाळे-जळमटांची सफाई केली जाते. केवळ घरांतलाच नव्हे तर मनामनांत साठलेला केरकचरा व जळमटे स्वच्छ करून घरांबरोबरच नातेसंबंधही धुऊन-पुसून लख्ख करणारा हा सण आहे. त्यात यंदाची दिवाळी तर तब्बल सहा दिवसांची आली. त्यामुळे बच्चे कंपनी व आई-बाबाच नव्हे तर आठवडाभर घरी जमलेल्या मेळ्याने आजी-आजोबांच्या आनंदालाही उधाण आले आहे. 28 ऑक्टोबरला वसुबारसेच्या दिवशी फटाक्यांच्या धडाsड धूsम आवाजात दीपोत्सवाचा हा सण सुरू झाला. 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, तर 31 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी झाली. शुक्रवारी सायंकाळी फटाक्यांच्या

प्रचंड आतषबाजीत

लक्ष्मीपूजन पार पडले. आता शनिवारी दिवाळी पाडवा आणि रविवारी भाऊबीज हे दिवाळीचे आणखी दोन महत्त्वाचे दिवस शिल्लक आहेत. हिंदू धर्मात सण-वार आणि उत्सवांची तशी वाणवा नाही. पण दिवाळीचे एक आगळेवेगळे स्थान आहे. अंधारावर मात करून संकटांतून मार्ग काढत नव्या प्रकाशवाटा शोधणारा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. परिस्थिती कशीही असो, गरीब असो वा श्रीमंत, राव असो वा रंक प्रत्येकाच्या घरात दिवाळीच्या आगमनाचे औत्सुक्य व कुतूहल सारखेच असते. आनंद वाटणे हाच तर सर्व सणांचा मुख्य उद्देश असतो. आपले कुटुंब, नातेवाईक व मित्रपरिवारांतच जो-तो माणूस सुखाचे व आनंदाचे हे क्षण शोधत असतो. त्यामुळेच तर गोडधोड व खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल घरापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या फराळासाठी आप्तस्वकीयांना निमंत्रणे धाडली जातात. दिवाळीचा सण म्हणजे व्यापारी वर्गासाठी मोठीच पर्वणी. नवीन पोशाखांची व नव्या वस्तूंची खरेदी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर होत असल्याने बाजारपेठाही सालाबादप्रमाणे रोषणाईने नटल्या आहेत. धनत्रयोदशीला

सुवर्ण खरेदीसाठी

सराफांच्या पेढ्यांवर झुंबड उडाली होती. आता बलिप्रतिपदेला वाहन व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबतच घर खरेदीही मोठ्या प्रमाणावर होईल. महागाई कितीही वाढो, कितीही संकटे येवोत, पण त्यातून मार्ग काढत दिवाळी दणदणीत साजरी करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. सर्वाधिक उत्साहाचा, मांगल्याचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. आजूबाजूला उत्साहवर्धक म्हणावे असे काहीही घडत नसताना महाराष्ट्रातील व देशातील जनता आपापल्या परीने दीपोत्सवाच्या या सणात जमेल तसा आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. दिवाळीबरोबरच महाराष्ट्रात निवडणुकांचा धूमधडाका सुरू आहे. राज्यकर्त्यांच्या रूपाने खोकेबाज नरकासुरांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालेला आहे. विश्वासघात व गद्दारीची जळमटे सर्वत्र लटकलेली दिसत आहेत. मराठी जनतेच्या तोंडचा घास काढून महाराष्ट्रातील उद्योगधंदे राज्याबाहेर पळवले जात आहेत. 8 लाख कोटींचे कर्ज करून महाराष्ट्राचे दिवाळे काढण्याचा प्रयत्न दिल्लीच्या हुकूमावरून सुरू आहे. महाराष्ट्राला ओरबाडणाऱ्या नरकासुरांना  गाडण्यासाठी दिवाळीनंतरच्या निवडणुकीत मराठी जनतेला मोठीच साफसफाई करावी लागेल. त्यासाठी दिवाळीनंतरही फटाके राखून ठेवावे लागतील. खोकेबाज सरकारच्या खुर्चीखाली ‘आवाज’ काढावाच लागेल!