महायुतीच्या प्रचारातून अजित पवार गायब; जाहिरातींमध्ये शिंदे, फडणवीस आणि मोदींचे फोटो

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती उतरली आहे. पण महायुतीच्या प्रचारांत अजित पवार गायब आहेत. महायुतीच्या प्रचाराच्या जाहिरातींमधून अजित पवार यांचे फोटो गायब आहेत. फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हे चित्र आहे.

फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. महायुतीच्या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चेहरे आहेत. महायुतीच्या प्रचाराच्या अनेक जाहिराती मराठी वाहिन्यांवर चालवल्या जात आहेत. या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अजित पवार यांचा फोटोच लावलेला नाही.

गेल्या काही दिवसांत भाजप आणि अजित पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे का असा सवाल उपस्थित होतोय. कारण ठरले आहे नवाब मलिक यांची उमेदवारी. अजित पवार यांनी नवाब मलिक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्ट केले आहे.