दशक्रिया विधीसाठी आदिवासींची पायपीट

खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना मूलभूत हक्कासाठी झगडावे लागत आहे. जिवंतपणी अनेक यातना भोगणाऱ्या या समाजाला मरणानंतरही अवहेलना सहन करावी लागते. चौक परिसरातील आदिवासी समाजबांधवांना दशक्रिया विधी करण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट करून नदीकिनारा गाठावा लागतो. वावोशीतील आदिवासी बांधव जांभिवली येथील नदीकिनारी धार्मिक विधीसाठी येतात. मात्र या ठिकाणी समाज मंदिर नसल्याने ऊन, वारा, पाऊस याचा सामना करत त्यांना धार्मिक विधी पार पाडावी लागतात. गेल्या दोन वर्षांपासून समाज मंदिर बांधण्याकडे मिंधे सरकारने लक्ष न दिल्यामुळे आदिवासी बांधवांची ससेहोलपट होत आहे.

वावोशी परिसरातील आदिवासी बांधव हे जांभिवली (छत्तीशी विभाग) येथील साईबाबा मंदिराजवळील नदीवर धार्मिक विधी पार पाडत असतात. आदिवासी बांधव हे दशक्रिया विधी नेहमीच नदीकाठी करत असतात. दशक्रिया विधी नदीकाठी करण्याची त्यांची जुनी परंपरा आहे. मात्र नदी-नाले हे जानेवारीनंतर जूनपर्यंत कोरडे पडलेले असतात. त्यामुळे या लोकांना आपल्या घरापासून पाच किलोमीटर असलेल्या नदीवर जाऊन त्यांना विधी करावा लागतो. त्यामुळे येथील लोक वावोशी फाटा येथील जांभिवली गावातून येणाऱ्या नदीकाठी असलेल्या कातळावर हा धार्मिक विधी पूर्ण करत असतात. मात्र हा धार्मिक विधी पूर्ण करत असताना ऊन, वारा, पावसाचा व्यत्यय येत असतो. त्यामुळे हे विधी करताना अडचणी येत असतात. या अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी बांधवांना या ठिकाणी समाज मंदिर सभागृह बांधून मिळावे अशी मागणी आदिवासी बांधवांची आहे.

कर्जाचा बोजा
आदिवासी समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. समाजात दशक्रिया विधी करणे क्रमप्राप्त असल्याने कर्ज किंवा उसनवारी करून विधी पूर्ण करावा लागतो. जांभिवली येथील साईबाबा मंदिराजवळ धार्मिक विधीसाठी समाज मंदिर सभागृह बांधून मिळावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य राम वाघमारे यांनी केली आहे.