सनियंत्रण समितीच्या आडमुठेपणामुळे माथेरानमधील हातरिक्षाचालकाचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. परशुराम पिरकट असे या दुर्दैवी हातरिक्षाचालकाचे नाव असून तो पर्यटकांना घेऊन हातरिक्षा ओढत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला. त्याला बी. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आज सकाळी हातरिक्षा क्रमांक 31 चे चालक परशुराम यांनी दस्तुरी येथे पर्यटकांना रिक्षेत बसवले. वे साईड हॉटेलचा चढ चढून मेरिटाईम हाऊसजवळ पोहोचताच ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना सहकारी हातरिक्षा व ई-रिक्षाचालकांनी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र रस्त्यातच परशुराम यांचा मृत्यू झाला. सनियंत्रण समितीने सर्व हातरिक्षाचालकांना इलेक्ट्रिक रिक्षा चालवण्याची परवानगी दिली असती तर आज परशुराम बचावला असता, असे मत सहकारी हातरिक्षाचालक लक्ष्मण यादव यांनी व्यक्त केले.
श्रमिक संघटनेचा संताप
माथेरानमध्ये एकूण 94 हातरिक्षाचालक असून त्यापैकी फक्त 20 चालकांना सनियंत्रण समितीने ई-रिक्षाची परवानगी दिली. उर्वरित 74 ई-रिक्षाचालक हे त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातरिक्षा ओढत आहेत. ही अमानवी प्रथा बंद करून सरसकट सर्व हातरिक्षाचालकांना ई-रिक्षाची परवानगी द्यावी, अशी मागणी श्रमिक संघटनेकडून समितीकडे करण्यात आली होती. या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातदेखील धाव घेतली होती. मात्र सनियंत्रण समितीच्या काही मूठभर लोकांच्या अडमुठी धोरणामुळे येथील हातरिक्षाचालकांवर ही वेळ ओढावल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.