हरिहरेश्वरमधील होम स्टे मालकांना मद्यपी पर्यटकांचा धसका

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या हरिहरेश्वर पर्यटन आणि तीर्थस्थळावरील होम स्टे मालकांनी मद्यपी पर्यटकांचा जोरदार धसका घेतला आहे. रविवारी रात्री दीडच्या सुमारास पुणे येथून आलेले मदधुंद पर्यटकांनी किरकोळ वादातून ममता स्टे होमच्या ज्योती धामणस्कर यांना गाडीखाली चिरडले. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर हरिहरेश्वर येथील होम स्टेचे मालक आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार अशा पाट्या लावलेले वाहनचालक व्यावसायिकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारीही स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.

हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि दिवेआगर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या भागातील पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे. ही समाधानकारक बाब असली तरी दारुड्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांची सुरक्षा अडचणीत आली असल्याचे ममता स्टे होमच्या समोर घडलेल्या प्रकारामुळे उघड झाले आहे. या स्टे होममध्ये आलेले पर्यटक हे दारू पिऊन तर्राट होते. त्यामुळे स्टे होमच्या मालकांनी त्यांना जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे या दारुड्या पर्यटकांनी स्टे होमच्या चालकांची बहीण ज्योती धामणस्कर यांच्या अंगावर गाडी घातली. भरधाव गाडीखाली ज्योती यांना चिरडण्यात आले. यात गंभीर जखमी झालेल्या ज्योती यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी अटक केली आहे. आठ आरोपी मात्र फरार आहेत. या हत्याकांडानंतर परिसरातील होम स्टे मालकांमध्ये घबराट पसरली आहे. दारुड्या पर्यटकांपासून वाचवा अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे.

दादागिरी वाढली

या भागात पर्यटक समूहाने येतात. काही पर्यटकांबरोबर तर वाहनांचा मोठा ताफा असतो. दारूच्या नशेत पर्यटक सुसाट वाहने चालवतात. त्याचाही त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो. आमचे नातेवाईक मोठ्या हुद्यावर काम करतात, अशी बतावणी करून काही पर्यटक व्यावसायिकांना थेट परवाना रद्द करण्याची धमकी देत आहेत. वाहनांवर पोलीस अधिकारी, केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन अशा पाट्या गाड्यांवर लावणाऱ्या पर्यटकांची दादागिरी वाढली आहे