राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण नऊ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 38 मतदारसंघांत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघांतील महिलांचा कल महत्त्वाचा ठरणार आहे.
महिलांची संख्या सर्वाधिक असलेल्या मतदारसंघामध्ये शहादा, नंदुरबार, अकोला पश्चिम, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, तिरोडा, भंडारा, गोंदिया, साकोली, आमगाव, अर्जुनी मोरगाव, अरमोडी, डहाणू, ब्रह्मपुरी, पालघर, माहीम, कर्जत, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, कसबा पेठ, शिरोळ, कोल्हापूर उत्तर, कागल, चंदगड, सोलापूर शहर उत्तर, दापोली, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, कुडाळ, मिरज आणि पलूस कडेगाव यांचा समावेश आहे.
राज्यात 18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार मतदार
18 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 मतदारांमध्ये पुरुष मतदार 12 लाख 91 हजार 847, 9 लाख 30 हजार 704 महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 153 इतकी आहे. 20 ते 29 या वयोगटातील एकूण 1 कोटी 88 लाख 45 हजार 005 तर 30 ते 39 या वयोगटातील एकूण 2 कोटी 18 लाख 15 हजार 278 मतदार आहेत. 40 ते 49 या वयोगटात 2 कोटी 7 लाख 30 हजार 598 तर 50 ते 59 या वयोगटात 1 कोटी 56 लाख 10 हजार 794 मतदारांची संख्या आहे. 60 ते 69 या वयोगटातील एकूण 99 लाख 18 हजार 520 मतदार तर 70 ते 79 या वयोगटातील एकूण 53 लाख 52 हजार 832 मतदार आहेत. 80 ते 89 या वयोगटात एकूण 20 लाख 33 हजार 958 तर 90 ते 99 या वयोगटात एकूण 4 लाख 48 हजार 38 मतदार आहेत.
शंभरी पार केलेले 47,392 मतदार
राज्यात वयाची शंभरी पार केलेल्या 47 हजार 389 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार 21 हजार 89, महिला मतदार 26 हजार 298 तर तृतीयपंथी मतदार 2 इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे.
पुण्यात सर्वाधिक तर सिंधुदुर्गात सर्वात कमी मतदार
राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिह्यात आहेत. पुणे जिह्यात 88 लाख 49 हजार 590 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 45 लाख 79 हजार 216 पुरुष मतदार, 42 लाख 69 हजार 569 महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार 805 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिह्यात आहे. सिंधुदुर्ग जिह्यात 6 लाख 78 हजार 928 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 3 लाख 36 हजार 991 पुरुष मतदार, 3 लाख 41 हजार 934 महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार 3 इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.