कायदा व सुव्यवस्थेचे वाजणार तीनतेरा, राज्यातील 28 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या, मुंबईतील 15 एसीपी हद्दपार

बुधवारी पोलीस निरीक्षकांच्या घाऊक बदल्या केल्यानंतर राज्य शासनाने आज राज्यातील 28 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यात मुंबई शहरातील 15 एसीपींचा समावेश आहे. दीडशेहून अधिक निरीक्षकांबरोबर 15 एसीपी हद्दपार करण्यात आल्याने शहरातल्या कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. ऐन निवडणुकीत 333 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर आज 28 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. दीपावली व निवडणुकीच्या दिवसांतच या बदल्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजण्याची भीती पोलीस दलातून व्यक्त केली जात आहे. मुंबईतील ज्योत्स्ना रासम, शशिकांत माने, मृत्युंजय हिरेमठ, रेणुका बुवा, सूर्यकांत बांगर, कल्पना गाडेकर, अविनाश पालवे, कुमुद कदम, महेश मुगुटराव, रवींद्र दळवी, किशोर गायके, राजू कसबे, अविनाश पालवे, संजय डहाके, सुहास कांबळे या एसीपींचा बदल्यांमध्ये समावेश आहे. निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये मुंबईतील महत्त्वाच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. आता एसीपी आणि वरिष्ठ निरीक्षकांना बदलल्याने अन्य अधिकाऱयांना कामकाज करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.