पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भाजपने करताच त्यांना तत्काळ बदलण्यात आले, पण वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना अद्याप या पदावरून हटवण्यात आले नाही? झारखंड-पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का, असा सवाल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला आहे.
वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र पाठवले आहे. यापूर्वी काँग्रेसने 24 सप्टेंबर व 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. 27 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱयावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती, पण या मागणीकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे.
पत्रात काय म्हटले आहे
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱयांना सोडले आहे. पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत, धमक्या देत आहेत. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पह्न टॅपिंग केले होते, शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत.
राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना पोलीस महासंचालकपदावर नियुक्त करण्यात आले आणि निवृत्तीनंतरही त्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यकाल वाढवून दिला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रात केली आहे.