दक्षिण आफ्रिकेचा कसोटीतील सर्वोच्च विजय, बांगलादेशचा डाव आणि 273धावांनी धुव्वा

हिंदुस्थानात दोन्ही कसोटी मालिका गमावल्यानंतर बांगलादेशला आपल्या मायदेशातही दक्षिण आफ्रिकेकडून सलग दुसऱया कसोटीतही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेने तीन फलंदाजांच्या शतकी खेळीच्या जोरावर 6 बाद 575 धावांचा डोंगर उभारल्यानंतर तिसऱया दिवशी बांगलादेशचे 16 फलंदाज अवघ्या 264 धावांत गारद केले आणि दुसरी कसोटी एक डाव आणि 273 धावांनी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा हा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे.

बुधवारी दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशची 4 बाद 38 अशी दुर्दशा केल्यामुळे कसोटी तिसऱया दिवशीच संपणार, याचे संकेत मिळाले होते आणि तिसऱया दिवशी झालेही तसे. दिवसाचा खेळ सुरू होताच रबाडाने बांगलादेशला हादरवत त्यांची 8 बाद 48 अशी भयानक अवस्था केली. पण तेव्हा मोमिनुल हकने 82 धावांची खेळी करत बांगलादेशला सावरण्याचा प्रयत्न केला, त्याने दहाव्या क्रमांकाच्या तैजुल इस्लामबरोबर 103 धावांची संस्मरणीय भागी रचल्यामुळे त्यांचा संघ दीडशेपलीकडे पोहोचला. मोमीनुल 82 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर तैजुलही बाद झाला. 159 धावांवर गारद झालेल्या बांगलादेशवर दक्षिण आफ्रिकेने फॉलोऑन लादल्यामुळे ते पुन्हा फलंदाजीला उतरले. दुसऱया डावात रबाडाला यश लाभले नाही. मात्र सेनुरन मुथुसामी आणि केशव महाराजच्या फिरकीने बांगलादेशचा दुसरा डाव 143 धावांच संपवत आपल्या कसोटीतील सर्वात मोठय़ा विजयाची नोंद केली.

मुथुसामीने 4 तर केशव महाराजने 5 विकेट टिपल्या. यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा डावाचा विजय बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफॉण्टेन येथे 2017 साली रचला गेला होती. ती कसोटी आफ्रिकेने डाव आणि 254 धावांनी जिंकली होती. पहिल्या डावात 177 धावांची खेळी करणारा टॉनी झॉर्झी ‘सामनावीर’ तर 14 विकेट टिपणारा पॅगिसो रबाडा ‘मालिकावीर’ ठरला.