विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे महामार्गावरील सुपे टोलनाक्यावर तैनात असलेल्या स्थिर पथकाने केलेल्या तपासणीत वाहतूक कंपनीच्या गाडीतून 10 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच चांदीची 40 किलोची वीट आढळून आली.
गाडीमध्ये सोने, चांदीच्या वस्तू आढळून आल्याची माहिती मिळताच आयकर विभागाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आचारसंहिता कक्षप्रमुख टोलनाक्यावर धाव घेतली. वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. तसेच त्यांच्याकडे असलेल्या वाहतुकीच्या पावत्या व प्रत्यक्षात असलेले सोने यांचा हिशेब जुळत नव्हता. सोन्याची वाहतूक नेमकी कुठून कुठे केली जात आहे, याबाबत वेगवेगळी माहिती दिली जात होती. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोने व चांदीच्या विविध वस्तूंची मोजदाद सुरू होती. रात्री उशिरापर्यंत 10 कोटींच्या सोन्याची मोजदाद झाली होती. सोन्याच्या अद्याप बऱ्याच वस्तू मोजणे बाकी आहे.
आनेवाडी टोलनाक्यावर 400 ग्रॅम सोने पकडले
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या आनेवाडी टोलनाक्यावर निवडणूक पथकाने तब्बल 400 ग्रॅम सोने वाहतूक करताना पकडले. याप्रकरणी भुईंज पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेतला. वाहन (एमएच 02 एफजी 3569) संशयास्पद आढळून आले. त्याची तपासणी केली असता, त्यात 400 ग्रॅम सोने आढळून आले. भुईंज पोलीस ठाण्यात प्राप्तीकर विभाग, जीएसटी अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली.