आता महाशक्तीच्या ढुसण्या सहन करा, अंबादास दानवे यांचा सदा सरवणकर यांना टोला

माहीममध्ये मिंधे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरेंनी उमेदवारी मागे घेऊन राज ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सरवणकर यांनी केली आहे. त्यावर घ्या महाशक्तीच्या ढुसण्या असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की माहीम विधानसभा मतदारसंघातून मिंधे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने मित्र पक्ष मिंधे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा द्या अशी विनंती केली होती.

या संपूर्ण प्रकरणावर अंबादास दानवे यांनी सरवणकर यांचे ट्विट रीट्विट करत म्हटले आहे की, आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या अंगणात नाचलं की हे असं होतं असतं. तुम्ही आमदार शिंदे गटाचे, तुमच्या जागेचा फैसला करणार भलतेच पक्ष म्हणजे मनसे आणि भाजप.. घ्या सहन करून ‘महाशक्ती’च्या ढुसण्या आता असे म्हणत दानवे यांनी सरवणकर यांना टोला लगावला आहे.