पुणे कसोटीत फिरकीपुढे फलंदाजांची झाली दाणादाण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले कारण

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 ऑक्टोबरपासून मुंबईत सुरू होणार आहे. न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिका विजय साजरा केला आहे. पुणे येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी फिरकीपुढे लोटांगण घातल्याने सर्वांनाच आश्चऱ्याचा धक्का बसला होता. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपले मौन सोडले असून फलंदाजांच्या खराब कामगिरीचे कारण सांगितले आहे.

पुणे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू सॅण्टनर याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना अलगद अडकवले. या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या 18 फलंदाजांना फिरकीपटूंनी तंबुचा रस्ता दाखवला. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचे फलंदाज फिरकीवर चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. मात्र पुणे कसोटीमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांची दाणदाण झाली. त्यामुळे माजी खेळाडूंनी फलंदाजांवर टीका सुद्धा केली. यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी फलंदाजांची बाजू घेत खराब कामगिरीचे कारण सांगितले. ते म्हणाले की, कधी कधी विरोधी संघालाही श्रेय दिले पाहिजे. मिचेल सॅण्टनरने मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र आम्हाला अजून मेहनत करावी लागणार आहे. खेळाडू आता आक्रमक फलंदाजी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बचावात्मक फलंदाजी करण्याच्या खेळाडूंच्या कौशल्यावर परिणाम होत आहे, असे गौतम गंभीर म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, यशस्वी कसोटी क्रिकेटर होण्यासाठी विराट कोहली सारख्या खेळाडूची गरज आहे. ज्या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे, त्या सर्व खेळाडूंचा बचावत्मक (Defence) खेळ चांगला राहिला आहे. एक परिपूर्ण खेळाडू तोच असतो जो टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी असतो, असं गौतम गंभीर म्हणाले.