भाजप आमदाराला मतदारसंघातच विरोध; वेशीवर रोखत गावकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार, सभास्थळावरून घेतला काढता पाय

मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांना आपल्या मतदारसंघात जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सभागृहात एक चकार शब्दही तुम्ही काढला नाही असे म्हणत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. पुढे याच गावात छोटेखानी बैठक करुन त्यांनी आपला प्रचार संपवला.

चार दिवसापूर्वी मांजरी गावात तुषार राठोड गेले असता आमच्या गावचा विकास व गावचे प्रश्न का मार्गी लावले नाहीत, यासारख्या प्रश्नांचा भडिमार करुन गावकऱ्यांनी त्यांच्या सभेत गोंधळ घातला होता. त्यामुळे त्यांना तिथून काढता पाय घेतला व सभा गुंडाळली. हा प्रकार ताजा असतानाच मुखेड तालुक्यातील होनवडज गावातही असाच प्रकार घडला.

मुखेड-कंधार विधानसभेमध्ये प्रचाराने जोर धरला असून महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने रंगत वाढली आहे. बंडखोर उमेदवार तथा मुख्यमंत्र्यांचे माजी खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी महायुतीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्ते यांना घाम फुटला आहे. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनीही प्रचारात आघाडी घेऊन विरोधी उमेदवारांना धडकी भरवली आहे.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार तुषार राठोड हे होनवडज या गावात प्रचारासाठी पोहोचताच मराठा समाजाच्या असंख्या तरुणांनी त्यांना वेशीवर अडवले. तुम्हाला मराठा समाजाने जास्तीचे मतदान करून आमदार केले, तुम्ही मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न असलेल्या आरक्षणाबद्दल विधानसभेच्या सभागृहात एक शब्दही का काढला नाही, अशा सवालांच्या फैरी तरुणांनी त्यांच्यावर झाडल्या. त्यामुळे सभा स्थळापासुन त्यांना काढता पाय घ्यावा लागला.