मेयोनिजमुळे अन्नातून अनेकांना विषबाधा झाल्याच्या तक्रारी तेलंगण सरकारकडे सातत्याने येत होत्या. ज्यामुळे तेलंगणच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी यासंदर्भात बंदी आदेश जारी केला आहे.
सँडविच, बर्गर आणि मोमोज यांसारख्या पदार्थांसोबत मिळणारे सॉसेजही त्यांची चव वाढवतात. आजकाल फास्ट फूडमध्ये मेयोनीजचा वापर सर्वाधिक वाढत आहे. विविध फास्ट फूडसोबत मेयोनिजचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असले तरी त्याचे अनेक दुष्परिणामही समोर आले आहेत. अलीकडेच तेलंगणमध्ये भेसळयुक्त मेयोनीज खाल्ल्याने 100 हून अधिकजणांची प्रकृती बिघडली. तर एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर तेलंगण सरकारने कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजवर बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोक आजारी पडल्यानंतर तेलंगण सरकारने याबाबत तपासणी केली. त्यामध्ये असे आढळून आले की, जे लोक आजारी पडले आहेत त्यापैकी अनेकांनी रस्त्यावरील अन्न खाल्ले आहे. हे अन्न विषारी होते. प्रशासनाकडून तपास करताना कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनीजचा वापर स्ट्रीट फूडमध्ये केल्याचे समोर आले. त्यामुळे ते विषारी झाले. अशावेळी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मेयोनीज लगेच तयार करून खाल्ल्यास ते ठिक असते. पण ते बराच वेळ ठेवले तर त्यात रासायनिक क्रिया होते आणि बॅक्टेरियामुळे अन्न दूषित होण्याची शक्यता असते.