लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर हरयाणातील एका तरुणासोबत ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तरुणाने मोबाईल नंबर मिळवीत लग्नाचा तगादा लावला होता. तरुणीने नकार देताच तिच्या फोटोचा वापर करून अश्लील व्हिडिओ तयार करुन बदनामी केली. तसेच लग्नासाठी तरुणीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा परिसरातील एक 25 वर्षीय तरुणी ही 1 सप्टेबर 2023 रोजी रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती. यावेळी तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची ओळख आर्यन प्रमोद गुलाटी (रा. झेड पार्क, फरीदाबाद हरयाणा) याच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्याने ‘आपण छोटी मोठी नोकरी करतो’ असे सांगितले होते. तिचे लंडनमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 18 सप्टेबर 2024 रोजी पदवी समारंभात तरुणीचे वडील व बहीण असे लंडनला गेले होते. त्यावेळी तेथे पीडितेने त्यांची ओळख आरोपीशी करुन दिली होती. 23 सप्टेबर रोजी पीडिता पुन्हा छत्रपती संभाजीनगरला परतली. दरम्यान, आर्यन गुलाटी हा तरुणीला वारंवार फोन करुन ‘लग्न कर’ असा तगादा लावत होता. तसेच तरुणीच्या आई-वडिलांना फोन करुन त्यांना देखील तिच्यासोबत माझे लग्न लावून द्या… अशी मागणी करत होता. त्याने 7 ऑक्टोबर रोजी तरुणीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व व्हिडिओ वडिलांना पाठविले. तसेच ‘माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्या वडिलांना जीवे मारुन टाकीन, तुझ्यावर अॅसिड फेकीन, अशा कामात मी माहीर आहे’ असे म्हणत फोनवर धमकी दिली.
त्यानंतर आर्यनच्या मित्राने तरुणीच्या वडिलांना फोन केला व अश्लील शिवीगाळ करून मी पंजाबातील एमएलएचा पुतण्या माणिक बोलतो आहे, तुमच्या मुलीचे लग्न आर्यनशी लावून द्या, अन्यथा तुमच्या घरी येऊन तुमच्या मुलीला उचलून नेऊ, तेंव्हा तुम्ही आमचे काही बिघडू शकत नाहीत!’ या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.