शिवडीत महाविकास आघाडीचा निर्धार, अजय चौधरी हॅटट्रिक करणारच!

शिवडी विधानसभेतील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अजय चौधरी यांच्या विजयाची हॅटट्रिक करणारच, असा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. निमित्त होते ते परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याचे. या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शिवडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्यात फोडाफोडीचे राजकारण भाजप आणि मिंधेंनी केल्यावर कोणत्याही दबावाला बळी न पडता अजय चौधरी हे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिले. दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघातील विकासकामांमुळे अजय चौधरींच्या विजयाची हॅटट्रिक निश्चितच होईल, असा विश्वास शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. आजपर्यंत विभागातील लोकोपयोगी कामे, विविध उपक्रम, कोरोना काळात केलेली कामे यामुळेच शिवडी विधानसभेतील नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे. याच कार्याच्या बळावर विधानसभेतील नागरिकांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी आणि या संधीचे सोने करण्यासाठी मी तत्पर असेन, असे अजय चौधरी म्हणाले.

या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक, विधानसभा संघटक सुधीर साळवी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष रूपेश खांडके, बबन कनावजे, शिवडी तालुका अध्यक्ष विजय झानझोरे, काँग्रेसचे गोरख कांगणे, राहुल कांबळे, जिल्हाध्यक्ष वैशाली कडने, स्मिता चौधरी, शिवराम शेट्टी, मंगेश कडू, सिंधू मसुरकर, विनय पांडे, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे आणि अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.