गोरेगावात शिवसेनेची मशालच धगधगणार, विजयी संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार

गोरेगाव हा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परंपरागत बालेकिल्ला असून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार समीर देसाई यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणारच, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. शिवसेना शाखा क्रमांक 58 च्या वतीने विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांच्या वतीने विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसैनिकांसह गोरेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेचे उमेदवार समीर देसाई यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच मृणालताई गोरे उड्डाणपूल, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपूल, माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी अशा शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या अनेक विकासकामांची माहिती त्यांनी दिली. शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांनीदेखील कार्यकर्त्यांना संबोधित केले. उमेदवार समीर देसाई यांनी जागर व समीर देसाई फाऊंडेशनतर्फे केलेल्या कामाची माहिती दिली.

या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर-शेठ, विधानसभा समन्वयक दीपक सुर्वे, उत्तर भारतीय मंचचे अशोक तिवारी, मनोज सिंग, माजी नगरसेविका प्रमिला शिंदे, उपविभाग संघटक कल्पिता तावडे, शाखाप्रमुख कमलाकांत नांदोस्कर, शाखा संघटक शोभना सकपाळ, शाखा समन्वयक दिशा दळवी यांच्यासह उपशाखाप्रमुख, शाखा संघटक, गटप्रमुख, गट संघटक आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.