बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे दरवर्षी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मिळत असताना या वर्षी केवळ बेस्ट आणि पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे 27 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेने केला आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी बेस्ट महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त कुणाच्या आदेशाची वाट पाहत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’मधून दररोज 35 लाखांवर मुंबईकर प्रवास करतात. प्रवाशांच्या अगदी घरापर्यंत सोडणारी बस चालवण्यासाठी हजारो कर्मचारी दिवस-रात्र काम करीत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून आर्थिक डोलारा कोलमडलेल्या ‘बेस्ट’ला आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अनुदान घ्यावे लागत आहे. बेस्ट कामगार सेनेकडून पाठपुरावा केल्यानंतर दिवाळीआधी याबाबत ‘बेस्ट’ प्रशासनाकडून पालिकेकडे निधी मिळण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावाही करावा लागतो. विशेष म्हणजे या वर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे हा पाठपुरावा निवडणूक जाहीर होण्याआधी करणे अनिवार्य होते. मात्र अशी कोणतीही तसदी ‘बेस्ट’ प्रशासनाने घेतली नसल्याने आणि 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने आचारसंहिता लागू असल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस मिळणे अशक्य बनले आहे.
पालिका-बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव का?
दिवाळीआधी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी बेस्ट कामगार सेनेने पालिका आयुक्त आणि महाव्यवस्थापकांनाही पत्र दिले. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्यानेच कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहिल्याचा आरोपही अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. एकीकडे पालिका कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपये बोनस दिला, मग बेस्ट कर्मचाऱ्यांनाच बोनस का दिला नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. हा दुजाभाव का, असा सवालही त्यांनी केला आहे.