पंडित हृदयनाथ मंगेशकर @ 87, विलेपार्ल्यात रविवारी रंगणार ‘हृदयसंगीत’

भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा 87 वा वाढदिवस आणि हृदयेश आर्टस्च्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गौरवार्थ दिवाळी पहाटला आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा ‘हृदयसंगीत’ हा सांगीतिक कार्यक्रम विभावरी आपटे जोशी, संपदा गोस्वामी, सुगंधा दाते आणि रवींद्र साठे सादर करतील. आनंद सहस्रबुद्धे यांचे संगीत संयोजन असून निवेदन विघ्नेश जोशी यांचे आहे.

मंगेशकर कुटुंबीय, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमींसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य सन्मानिका मास्टर दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे 30 ऑक्टोबरपासून उपलब्ध असतील, असे हृदयेश आर्टस्चे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर यांनी कळवले आहे.