>> मंगेश वरवडेकर
मुंबईकरांचे क्रिकेटप्रेम पुन्हा एकदा उफाळून आलेय. हिंदुस्थानने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर वानखेडेवरील तिसऱ्या कसोटीचे महत्त्व कमी होईल, असा अंदाज होता. मात्र पराभवाने खचलेल्या हिंदुस्थानी संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक दौऱयापूर्वी मनोधैर्य उंचावण्यासाठी मुंबईकर क्रिकेटप्रेमी वानखेडेवर अभूतपूर्व गर्दी करणार आहेत. उद्या शुक्रवारपासून वानखेडेवर सुरू होणाऱया तिसऱया कसोटी सामन्याची 90 टक्के तिकिटे विकली गेल्याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप यांनी दिली. त्यामुळे मुंबईकर आपली दिवाळी वानखेडेवर साजरी करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आता हिंदुस्थानी संघ मुंबईकरांची दिवाळी गोड करतो की कडू ते सामना सुरू झाल्यानंतरच कळेल.
मुंबईचे आणि मुंबईकरांचे क्रिकेटप्रेम हे जगद्विख्यात आहे. इथे रणजी लढतीलाही मोठय़ा संख्येने क्रिकेटप्रेमी येतात आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतात. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपदरम्यान हिंदुस्थानवगळता झालेल्या अन्य संघाच्या लढतींनाही मुंबईकरांनी विक्रमी गर्दी केली होती. मुंबईच्या तुलनेत अन्य स्टेडियमवर झालेल्या लढतींना प्रेक्षकांच्या अत्यल्प उपस्थितीने आयोजकांना आणि खेळाडूंना निराश केले होते. तेव्हाच मुंबईचे क्रिकेटप्रेम अवघ्या हिंदुस्थाननेच नव्हे तर जगभरातील क्रिकेट संघांनीही अनुभवले होते.
मुंबईकरांना सलाम
वानखेडेवरील कसोटीची तिकीट विक्री पहिली कसोटी सामन्याच्या वेळीच सुरू झाली होती. तेव्हा ऑनलाईन तिकीट विक्री अॅपवर मुंबईकर तुटून पडले होते. त्यानंतर हिंदुस्थानने आधी बंगळुरू कसोटी गमावली. मग गेल्या आठवडय़ात पुणे कसोटीही गमावली. पण या सामन्यांच्या निकालाशी मुंबईकरांचे काहीही घेणेदेणे नव्हते. कारण त्यांनी तिकीट विक्री सुरू होताच आपली तिकिटे बुक केली आणि उरलेली तिकिटे हिंदुस्थानने मालिका गमावल्यानंतरही खरेदी केली. साधारणतः मालिका गमावल्यानंतर पुढील लढतीकडे प्रेक्षक पाठ फिरवतात, पण मुंबईकरांच्या क्रिकेटप्रेमाने याला चक्क फाटा दिला आहे. हिंदुस्थानी संघ मुंबई कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱयावर रवाना व्हावा म्हणून वानखेडेवर येणार आहेत. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ मुंबईच्याच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानच्या क्रिकेटप्रेमींना दिवाळीची विजयी भेट देणार, असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.
क्रिकेटप्रेमींची तहान भागवणार
मुंबई क्रिकेट संघटनेने नेहमीच आपल्या मुंबईकरांच्या क्रिकेटप्रेमाची काळजी घेतली आहे. गेल्या पुणे कसोटीत जे घडले ते वानखेडेवर कदापि होणार नाही. क्रिकेटप्रेमींनी तिकीट विक्रीला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे वानखेडे स्टेडियमवर पिण्याच्या पाण्यासाठी 20 काऊंटर लावले जाणार असून 20 लिटरचे तब्बल 1000 जार आणले असल्याची माहिती एमसीए सचिव अभय हडप यांनी दिली. त्यामुळे मुंबईच्या असह्य उकाडय़ात मुंबईकर क्रिकेटप्रेमींची एमसीए विनामूल्य तहान भागवणार, हे निश्चित आहे.
25 हजारांची गर्दी अपेक्षित
पहिल्या दोन्ही लढतींत हरलेल्या हिंदुस्थानचा खेळ पाहण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वानखेडेवर किमान 25 हजारांपेक्षा अधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी उसळणार असल्याचे तिकीट विक्रीतून स्पष्ट झाले आहे. जर पहिल्या दिवशी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर 33 हजार क्षमतेचे वानखेडे हाऊसफुल्ल होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर काळय़ा बाजारात कसोटीचीही तिकिटे मोठय़ा किमतीत विकली जाण्याची शक्यता आहे.